पुण्यापासून 41 मिनिटांवर गाव, 40 वर्षांनंतर आज पोहोचली वीज, गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वेताळनगर या दुर्गम गावात ४० वर्षांनी वीज आली. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ३५ कुटुंबांचे स्वप्न पूर्ण झाले. गावात विकासाच्या नव्या वाटा खुल्या झाल्या.
डोंगरदऱ्यांच्या कुशीत वसलेल्या लोणावळा परिसरातील दुर्गम अशा वेताळनगर गावासाठी आजचा दिवस सुवर्णअक्षरांनी लिहिण्यासारखा ठरला आहे. गेल्या ४० वर्षांपासून अंधारात जगणाऱ्या या गावाला अखेर प्रकाश लाभला असून, तब्बल चार दशकांनंतर गावात वीजपुरवठा सुरू झाला. गावातील ३५ कुटुंबांनी पाहिलेले दिव्याची स्वप्न अखेर सत्यात उतरलं असून, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार संपूर्ण गाव झाला आहे.
चार दशकांचा वनवास संपला
वेताळनगरमधील ग्रामस्थांसाठी गेल्या ४० वर्षांचा प्रवास अत्यंत कठीण होता. विजेअभावी येथील पिढ्या अंधारात लहानाच्या मोठ्या झाल्या. ग्रामस्थांकडून वीजपुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता, निवेदने दिली जात होती. मात्र, तांत्रिक अडचणी आणि 'डीपीपीसी'मधून वेळेवर अनुदान उपलब्ध न झाल्यामुळे या कामाला वारंवार विलंब होत होता. प्रत्येक वेळी पदरी निराशा येत असतानाही ग्रामस्थांनी आपली जिद्द सोडली नव्हती.
advertisement
अडथळ्यांची शर्यत आणि प्रशासकीय यश
या कामासाठी ५८ नवीन विद्युत वाहक पोल्सना मंजुरी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली. दुर्गम डोंगरदऱ्यांतून वीजवाहक खांब नेणे आणि तारा ओढणे हे मोठे आव्हान होते. मात्र, आमदार सुनील शेळके यांनी वैयक्तिक लक्ष घालून विशेष पुढाकार घेतला आणि आवश्यक अनुदान उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सकारात्मक प्रयत्नांमुळेच प्रशासकीय पातळीवरील सर्व अडथळे दूर झाले आणि वेताळनगरच्या दिशेने विजेची तार धावू लागली.
advertisement

ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण
गावात जेव्हा पहिल्यांदा बल्ब पेटला, तेव्हा ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही. कित्येक ज्येष्ठ ग्रामस्थांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. "आमच्या आयुष्यातील अंधार आता कायमचा संपला," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आमदारांच्या पुढाकारामुळेच आज आम्ही हा प्रकाश पाहू शकत आहोत, असे म्हणत ग्रामस्थांनी सुनील शेळके यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. लोणावळ्यासारख्या पर्यटन क्षेत्राच्या जवळ असूनही विकासापासून वंचित असलेल्या या गावाला आता नवी ओळख मिळाली आहे.
advertisement
विकासाच्या नव्या वाटा खुल्या होणार
view commentsगावात वीज आल्यामुळे आता केवळ घरांत प्रकाश पडला नाही, तर विकासाच्या नव्या वाटाही खुल्या झाल्या आहेत. यामुळे मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा, शेतीसाठीचा पाणीपुरवठा आणि दैनंदिन जीवन सुसह्य होणार आहे. वेताळनगरसाठी हा दिवस खरोखरच ऐतिहासिक ठरला असून, विकासाच्या दिशेने टाकलेले हे सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अंधारातून प्रकाशाकडे झालेला हा प्रवास गावाच्या प्रगतीची नवीन पहाट घेऊन आला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 8:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यापासून 41 मिनिटांवर गाव, 40 वर्षांनंतर आज पोहोचली वीज, गावकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू









