'पैसे बाटेंगे जितेंगे, हा नोट जिहाद...', विनोद तावडेंवर उद्धव ठाकरे बरसले
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर नोटा वाटल्याचा आरोप होत आहे. विनोद तावडे यांच्यावर होत असलेल्या या आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर नोटा वाटल्याचा आरोप होत आहे. बहुजन विकास आघाडीचे नेते क्षीतीज ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसोबत विरारच्या हॉटेलमध्ये जाऊन धडक दिली, तसंच विनोद तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप केला. याप्रकरणानंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं असतानाच उद्धव ठाकरे यांनी विनोद तावडे आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
'हा व्हिडिओ निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे, कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं. आज पैसे वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून? कुणाच्या खिशात जात होते? तुळजा भवानीच्या दर्शनाला जात असताना माझी बॅग तपासली, मग यांच्या बॅगेतले पैसे तपासणार कोण? निवडणूक आयोगाने यात कठोर कारवाई केली पाहिजे. नाहीतर निवडणूक आयोगावर कारवाई करण्यासाठी आम्हाला वेगळा मार्ग बघावा लागेल', असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
advertisement
'गुन्हा दाखल होऊन आरोपी फरार होता कामा नये. हे सगळं घडलं असेल आणि तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर कारवाई झाली पाहिजे, कारण कायदा सगळ्यांना सारखा पाहिजे. तावडे तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंत सरकार कशी पाडली आणि कशी बनवली याचा पुरावा आहे. ज्या जागृकतेने हे कटकारस्थान घडलं असेल आणि उघडकीस आणलं असेल त्यांचं कौतुक केलं पाहिजे, पण हे त्यांच्यातलं गँगवॉर असू शकेल', असा संशय उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
advertisement
'बहिणीला 1500 रुपये आणि यांना थप्प्याच्या थप्प्या चालल्या आहेत. महाराष्ट्र हे उघड्या डोळ्याने बघत आहे. भाजप, मिंधे आणि अजित पवारांचा हा नोट जिहाद आहे का? पैसा बाटेंगे और जितेंगे, असं त्यांचं काही आहे का? याचा छडा लागला पाहिजे', असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 19, 2024 5:40 PM IST


