एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! सख्ख्या बहीण-भावाचा खड्ड्यात बडून मृत्यू, परिसरात हळहळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
निरपराध दोन लहानग्यांचा अशा प्रकारे जीव जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील महागाव कसबा येथे बुधवारी (1 ऑक्टोबर) सकाळी साईनगरी लेआऊटमध्ये पाण्याने भरलेल्या खड्ड्यात दोन लहान भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आले आहे. प्रियांका गणेश राठोड (वय 10) व कार्तिक गणेश राठोड (वय 8) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारव्हा-आर्णी रोडलगतच्या साईनगरी लेआऊट परिसरात दहा फूट खोल गड्डे खोदण्यात आले होते. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचले होते. मंगळवारी (30 सप्टेंबर) सायंकाळी खेळण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रियांका व कार्तिक या दोघे पोहण्यासाठी खड्ड्यात उतरले. मात्र पोहता न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला.
संपूर्ण गावात हळहळ
रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न परतल्याने पालकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्रभर तपास करूनही मुले सापडली नाहीत. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास स्थानिक नागरिकांना खड्ड्यात मुलांचे मृतदेह दिसून आले. तात्काळ ही माहिती गावकऱ्यांनी पालकांना दिली. घटनेचे वृत्त पसरताच नागरिकांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली. या अनपेक्षित मृत्यूमुळे राठोड कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. निरपराध दोन लहानग्यांचा अशा प्रकारे जीव जाणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
advertisement
दोन जीव गमावले
दरम्यान, ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. रस्त्यालगत खोदण्यात आलेल्या या धोकादायक खड्ड्यांवर कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा सूचना फलक लावण्यात आले नव्हते. त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे अशा प्रकारचे खड्डे उघडे ठेवू नयेत, त्यांच्यावर कुंपण करावे आणि सुरक्षिततेची पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे. या घटनेमुळे महागाव कसबा परिसरात शोककळा पसरली असून दोन लहान जीव गमावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Yavatmal,Maharashtra
First Published :
October 01, 2025 4:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! सख्ख्या बहीण-भावाचा खड्ड्यात बडून मृत्यू, परिसरात हळहळ