Shocking Scam: राहुल द्रविडच्या इंदिरानगरमध्ये घडले भयानक, महिला 6 महिने सायबर कैदेत; 32 कोटींचा सर्वनाश; प्रकार पाहून पोलिसांना विश्वास बसेना
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Shocking Cyber Scam: बेंगळुरूच्या इंदिरानगरमध्ये घडलेल्या एका अविश्वसनीय सायबर घोटाळ्याने सर्वांना हादरवले आहे. 57 वर्षीय IT महिलेला सहा महिने डिजिटल नजरकैदेत ठेवत तब्बल 31.83 कोटींची फसवणूक करण्यात आली.
बेंगळुरू: 'इंदिरा नगर का गुंडा', असे वाक्य असलेली राहुल द्रविड याची एक जाहिरात तुम्हाला आठवत असेल. नेहमी शांत आणि संयमी राहुल द्रविडचे आक्रमक आणि रागीट रुप या जाहिरातीत दाखवण्यात आले होते. आता बेंगळुरूच्या इंदिरा नगर परिसरात द्रविड राहतो तेथे अशी एक घटना घडली आहे ज्याने एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
बेंगळुरूच्या इंदिरानगरमधील एका 57 वर्षीय ज्येष्ठ आयटी व्यावसायिका महिलेला 'डिजिटल अटक' (Digital Arrest) नावाच्या सायबर घोटाळ्यात सहा महिन्यांत 31.83 कोटी गमवावे लागले. कर्नाटकात एकाच पीडितेने गमावलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. सायबर गुन्हेगारांनी तिला सतत डिजिटल पाळत ठेवून धमक्या दिल्या आणि तिची फसवणूक केली. मार्च 2025 मध्ये त्यांनी अचानक संपर्क तोडण्यापूर्वी ती रुग्णालयात असतानाही तिची पाळत सुरू होती.
advertisement
15 सप्टेंबर 2024 रोजी महिलेला डीएचएलच्या कर्मचाऱ्याच्या वेशात असलेल्या व्यक्तीचा फोन आला. या व्यक्तीने मुंबईतील त्यांच्या कार्यालयात तिच्या नावावर एक संशयास्पद पार्सल आले असून त्यात क्रेडिट कार्ड्स, अनेक पासपोर्ट आणि प्रतिबंधित एमडीएमए ड्रग्ज आहेत, असा दावा केला. बेंगळुरूमध्ये राहणाऱ्या महिलेने पार्सलशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगितल्यावर तिच्या फोन नंबरचा पार्सलशी संबंध असल्याने तो सायबर गुन्हेगारीचा प्रकार असू शकतो, असे सांगून कॉल सायबर गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आला.
advertisement
कॉल हस्तांतरित झाल्यावर समोरच्या व्यक्तीने स्वतःला 'सीबीआय अधिकारी' म्हणून सादर केले. यानंतर महिलेचा 'धमक्या आणि भीतीने भरलेला भयानक अनुभव' सुरू झाला. फसवणूक करणाऱ्यांनी तिला स्थानिक पोलिसांशी किंवा वकिलांशी संपर्क साधू नये, अन्यथा शक्तिशाली गुन्हेगार तिच्यावर लक्ष ठेवून असल्याचे सांगून धमकावले. त्यांनी तिच्या कुटुंबाला हानी पोहोचवण्याची धमकी दिली. मुलाचे लग्न जवळ आल्याने घाबरून तिने त्यांच्या सूचनांचे पालन केले.
advertisement
गुन्हेगारांनी तिला डिजिटल नजरकैदेत ठेवले आणि स्काईप व्हिडिओ कॉलवर कॅमेरा चालू ठेवून सतत संपर्कात राहण्याची सक्ती केली. 'सीबीआय अधिकारी प्रदीप सिंग' असल्याचे भासवणाऱ्या व्यक्तीने 'राहुल यादव' नावाच्या दुसऱ्या व्यक्तीला आठवड्याभरासाठी तिच्यावर 'नजर ठेवण्याचे' काम सोपवले. या काळात ती घरून काम करत राहिली, पण सतत फसवणूक करणाऱ्यांशी कनेक्टेड राहिली.
advertisement
23 सप्टेंबर रोजी स्काईपद्वारे चौकशीसाठी तिला एका हॉटेलमध्ये नेण्यात आले आणि 'आरबीआयच्या आर्थिक गुप्तचर युनिट (FIU) कडून पडताळणी' करण्यासाठी तिच्या सर्व मालमत्तेची घोषणा सादर करण्यास सांगितले. या 'नजरकैदेच्या' काळात, तिने 187 व्यवहार केले, ज्याची एकूण रक्कम 31.83 कोटी होती. फसवणूक करणाऱ्यांनी फेब्रुवारी 2025 पर्यंत पडताळणीनंतर पैसे परत करण्याची हमी दिली आणि डिसेंबर 1 रोजी तिच्या मुलाच्या साखरपुड्यापूर्वी तिला बनावट 'क्लिअरन्स सर्टिफिकेट' देखील पाठवले.
advertisement
त्यानंतर ती आजारी पडून रुग्णालयात दाखल झाली, तरीही तिला दररोज स्काईपवर माहिती देण्यास भाग पाडले गेले. सततच्या धमक्या आणि विलंबामुळे हा त्रास अनेक महिने सुरू राहिला. अखेर फसवणूक करणाऱ्यांनी 26 मार्च रोजी सर्व संपर्क तोडला. पीडित महिलेने 14 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. धक्कादायक म्हणजे मुलाचे जूनमधील लग्न आणि परदेश प्रवास यामुळे तक्रार करण्यास उशीर झाला. तसेच नंतर सुमारे एक महिना ती आजारी होती, असे तिने पोलिसांना सांगितले.
ईस्ट सायबर क्राइम पोलिसांनी आता एफआयआर (FIR) दाखल केली आहे आणि व्यवहारांच्या लांब साखळीचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. गमावलेली रक्कम 3 कोटींपेक्षा जास्त असल्याने, हे प्रकरण सीआयडीकडे (CID) हस्तांतरित होण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. जर तिने कोणाला तरी सांगितले असते किंवा कॉल लवकर कट केला असता, तर ती सुरक्षित राहिली असती, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2025 3:46 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Shocking Scam: राहुल द्रविडच्या इंदिरानगरमध्ये घडले भयानक, महिला 6 महिने सायबर कैदेत; 32 कोटींचा सर्वनाश; प्रकार पाहून पोलिसांना विश्वास बसेना


