मुंबईकरांनो लक्ष द्या! तुम्ही निवडलेले नगरसेवक आहेत बाहुबली, झोप उडवणारा अहवाल समोर
- Reported by:susmita Bhadane patil
- Published by:Prachi Amale
Last Updated:
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा सविस्तर अभ्यास करण्यात आला.
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पार्श्वभूमीचा धक्कादायक अहवाल समोर आला असून, सुमारे 25 टक्के विजयी नगरसेवकांवर गुन्हेगारी प्रकरणांची नोंद असल्याचे उघड झाले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून ही माहिती पुढे आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे हा सविस्तर अभ्यास करण्यात आला.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या एकूण 227 विजयी नगरसेवकांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करण्यात आले असून, त्यापैकी 54 नगरसेवकांनी (सुमारे 24 टक्के) आपल्यावर गुन्हेगारी प्रकरणे प्रलंबित असल्याचे जाहीर केले आहे. यामध्ये 29 नगरसेवकांवर (13 टक्के) गंभीर स्वरूपाचे गुन्हेगारी आरोप असल्याची नोंद आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, फसवणूक, दरोडा आणि महिलांविरोधातील गुन्हे अशा स्वरूपाच्या प्रकरणांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.
advertisement
स्वराज्य संस्थांतील कारभाराच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह
या अहवालामुळे मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या गुन्हेगारीकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. लोकशाही प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांची पार्श्वभूमी स्वच्छ असावी, अशी अपेक्षा असतानाच विजयी ठरलेल्या सुमारे चारपैकी एका उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणे चिंताजनक मानले जात आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील कारभाराच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
advertisement
पाचपैकी चार विजयी उमेदवार कोट्याधीश
दरम्यान, आर्थिक बाबींचा विचार केला असता, जवळपास पाचपैकी चार विजयी उमेदवार कोट्याधीश असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बहुतांश उमेदवारांनी आपल्या प्रतिज्ञापत्रांत कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे. वाढती आर्थिक असमानता आणि निवडणूक खर्चाचा वाढता बोजा यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी निवडणूक लढवणे अधिक कठीण होत असल्याची बाब यातून समोर येते.
advertisement
उमेदवारांची निवड करताना अधिक काटेकोर निकष लावावेत
एडीआर आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉच यांनी मतदारांनी उमेदवारांच्या पार्श्वभूमीची माहिती घेऊन जाणीवपूर्वक मतदान करावे, तसेच राजकीय पक्षांनी उमेदवारांची निवड करताना अधिक काटेकोर निकष लावावेत, अशी शिफारस केली आहे. उमेदवारांची स्वच्छ प्रतिमा आणि आर्थिक पारदर्शकता अत्यंत महत्त्वाची असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 3:33 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकरांनो लक्ष द्या! तुम्ही निवडलेले नगरसेवक आहेत बाहुबली, झोप उडवणारा अहवाल समोर









