'तुमचा दादा काम करणारा'; अजित पवारांचा महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण संदेश !
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अजित पवार यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे, या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
मुंबई, प्रतिनिधी : राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आहे. 'महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश !' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
'नमस्कार माझ्या महाराष्ट्रवासियांनो, मी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केला, तुम्ही पाहिला असेलच, राज्याचा असा ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर करण्याचं भाग्य मला लाभलं. याचा मला सार्थ अभिमान आहे. या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली, या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात दर महा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. या योजनेसाठी दरवर्षी राज्य सरकार 46000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
advertisement
आजवर आपण पाहात आलो आहेत, आई आपल्या खर्चात काटकसर करते पण आपल्या मुलांना काही कमी पडू देत नाही. परंतु काही वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की आर्थिक अडचणींमुळे घरातील मुलांकडे जास्त लक्ष दिलं जातं, आणि नेमकं मुलींकडे दुर्लक्ष होतं. मात्र मला आता आशा आहे की, माझी लाडकी बहिण या योजनेच्या माध्यमातून महिलांची आर्थिक विवंचना निश्चितपण दूर होईल. त्या आर्थिकदृष्ट्या अधिक सशक्त होतील. माझी मनस्वी इच्छा आहे की, राज्यातील महिलांनी स्वत: च्या पायावर उभे राहावे. स्ववलंबी व्हावं. त्यामुळे मी जेव्हा या योजनेचा विचार करतो तेव्हा मला हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्यीनं टाकण्यात आलेलं अंत्यत क्रांतीकारी पाऊल वाटतं.
advertisement
महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश !#दादाचा_वादा pic.twitter.com/JOlKJZMxYY
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 4, 2024
आमच्या सरकारने अनुभवाच्या जोरावर हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलं आहे. एवढंच नाही तर महिला पुरुषांच्या तुलनेत कुठेही मागे राहणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी अनेक पाऊलं उचण्यात आले आहेत. अर्थसंकल्पात राज्यात २५ हजार उद्योगांच्या उभारणीसाठी आर्थिक तरतुद करण्यात आली आहे. एवढंच नाही तर शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची योजना म्हणजे युवा कार्यप्रशिक्षण योजना, या योजनेच्या माध्यमातून तरुण, तरुणींना औद्योगिक प्रशिक्षण तसेच सोबतच दहा हजार रुपयांपर्यंतच स्टायपेंड दिला जाईल.
advertisement
वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे. वारीतील मुख्य दिंड्यांना प्रति दिंडी वीस हजार रुपये देण्यात येणार आहेत. अनेक लोक या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत, मला फक्त इतकंच सांगायचं आहे, या लोकांमध्ये आणि तुमच्या अजितदादांमध्ये हाच फरक आहे, की ते राजकारण करणारे आहेत, आणि तुमचा दादा काम करणारा आहे. अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे ते म्हणजे मी राजकारणात आल्यापासून कोणताही पक्ष बदलेला नाही, पार्टी बदलेली नाहीये. जनता हाच माझा पक्ष आहे, मी पूर्वीही जनतेचा होतो आणि आताही जनतेचा आहे,' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 04, 2024 1:53 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
'तुमचा दादा काम करणारा'; अजित पवारांचा महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्त्वपूर्ण संदेश !


