लग्नाआधीच प्रसुती, 6 तास बेशुद्ध अन् ..., अल्पवयीन प्रियकरानं केलं असं कांड, कल्याण हादरलं
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Kalyan News: पोटाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्याच दिवशी ती कामावर गेली. मात्र, अशक्तपणामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली होती.
कल्याण: कल्याण पश्चिमेकडील बारावे गाव परिसरात मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. शिवमंदिरासमोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली होती. 17 ऑगस्ट रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच खडकपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अर्भकाला केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले.
हे अर्भक नेमके कोणाचे आहे याचा शोध घेण्यासाठी खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू केला असता या घटनेमागे अत्यंत वेदनादायक आणि गुंतागुंतीची कहाणी समोर आली. तपासादरम्यान एका अल्पवयीन कुमारी मातेने अनैतिक संबंधातून अर्भकाला जन्म दिल्याचे निष्पन्न झाले. संबंधित मुलगी खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तिच्या घरी भेट दिली असता घराला कुलूप होते. परिसरात चौकशी केली असता ती कामावर गेल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊन तिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने सांगितले की परिचित असलेल्या एका अल्पवयीन मुलासोबतच्या संबंधातून हे बाळ जन्माला आले. बाळ जन्मल्यानंतर मृत झाल्याचे त्या मुलाने सांगितल्याने तिने त्यावर विश्वास ठेवून नेहमीप्रमाणे कामावर जाणे सुरू ठेवले. तिच्या जबाबावरून पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.
advertisement
दरम्यान चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, दोन दिवस वेदना सहन करत तिने घराबाहेर पडणे टाळले होते. 16 ऑगस्ट रोजी तिला तीव्र त्रास झाल्यानंतर तिने घरीच स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. प्रसूतीनंतर चक्कर येऊन ती जवळपास सहा तास बेशुद्धावस्थेत पडून होती. याच काळात तिच्या प्रियकराने अर्भकाला उचलून बारावे गाव परिसरात कचऱ्यात फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले.
advertisement
पोटाची गरज भागवण्यासाठी दुसऱ्याच दिवशी ती कामावर गेली. मात्र, अशक्तपणामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली होती. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल केले असता तिचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी झाल्याचे निष्पन्न झाले. तिला जवळपास 13 बाटल्या रक्त चढविण्यात आल्या. वेळेत उपचार न मिळाल्यास तिचा जीवही धोक्यात आला असता असे डॉक्टरांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाचा छडा अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती आंधळे, सहायक पोलिस निरीक्षक विजय गायकवाड, सतीश पाटील व त्यांच्या पथकाने लावला. पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 9:33 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
लग्नाआधीच प्रसुती, 6 तास बेशुद्ध अन् ..., अल्पवयीन प्रियकरानं केलं असं कांड, कल्याण हादरलं








