Maharashtra Elections : 'मातोश्री'च्या अंगणात ठाकरे की काँग्रेस लढणार? महाविकास आघाडीचा तिढा सुटला
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
मुंबईतील काही जागांवर असलेला तिढा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने सोडवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रणाली कापसे, मुंबई : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असली तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटप अद्याप जाहीर झाले नाही. जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही बाजूला बैठकांचे सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीने आपल्यातील जागा वाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईतील काही जागांवर असलेला तिढा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने सोडवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मविआचा मुंबईतील तिढा सुटला...
मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत. त्यापैकी बहुतांशी जागांवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला. काँग्रेसनेही काही जागांवर दावा केल्याने मविआतील तिढा वाढला होता. वांद्रे पूर्व आणि चांदिवली या दोन जागांवर तिढा होता. अखेर या जागांवर तोडगा काढण्यात आला आहे. वांद्रे पूर्व येथील जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार असणार आहे. तर, चांदिवलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्वमधून काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. तर, चांदिवलीमधून शिवसेनेचे दिलीप लांडे यांचा कमी मताधिक्याने विजय झाला होता. शिवसेनेतील फुटीनंतर चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. तर, झिशान सिद्दिकी हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी झिशान सिद्दिकी यांचे वडील आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसचा हात सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले होते.
advertisement
कोण असणार उमेदवार?
महाविकास आघाडीत वांद्रे पूर्व आणि चांदिवली विधानसभा वादावर तोडगा निघाला. वांद्रे पूर्व विधानसभा उबाठा लढवणार तर चांदिवली विधानसभा काँग्रेस लढवणार आहेत. त्यामुळे युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व येथून निवडणूक लढवणार आहे. चांदिवलीतून नसीम खान यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत नसीम खान यांचा निसटता पराभव झाला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 16, 2024 11:19 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections : 'मातोश्री'च्या अंगणात ठाकरे की काँग्रेस लढणार? महाविकास आघाडीचा तिढा सुटला









