Sameer Wankhede : धडाकेबाज कारवाई ते आरोपांचा धुरळा, समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात का?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Election 2024 Sameer Wankhede : सनदी सेवेची नोकरी सोडून समीर वानखेडे राजकारणात का येणार आहेत, याची चर्चाही सुरू झाली आहे.
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल अधिकारी म्हणून काम केलेले आणि आपल्या कारवाईने चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समीर वानखेडे हे आता राजकारणात एन्ट्री घेणार असून थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. समीर वानखेडे हे शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात उतरणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार समीर वानखेडे हे मुंबईतील धारावी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला होता. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. पण, सनदी सेवेची नोकरी सोडून समीर वानखेडे राजकारणात का येणार आहेत, याची चर्चाही सुरू झाली आहे.
कोण आहे समीर गायकवाड?
समीर वानखेडे यांनी 2008 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना भारतीय महसूल सेवा मिळाली. पहिली पोस्टिंग मुंबईत झाली. याशिवाय त्यांनी इन्कम टॅक्स एअर इंटेलिजन्स युनिट, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्येही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. कर विभागात कार्यरत असताना समीर वानखेडे यांनी कर चोरी प्रकरणी 2500 जणांवर कारवाईचा बडगा उगारला होता. यातील 200 हुन अधिकजण हे बॉलिवूडशी संबंधित होते. त्यांच्या या कारवाईने जवळपास ८७ कोटींचा महसूल मिळाला होता.
advertisement
एनसीबीमध्ये पोस्टिंग, बॉलिवूड कलाकारांना धसका
२०१९ मध्ये समीर वानखेडे यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी अनेक धडाकेबाज कारवाई केली. त्यांनी विविध कारवाईत १७०० कोटींहून अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. अमली पदार्थ प्रकरणी बॉलिवूड कलाकारही त्यांच्या रडारवर आले होते.
अभिनेता दिवगंत सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर अमली पदार्थाच्या सेवनाचा मुद्दा समोर आला. त्यानंतर समीर वानखेडे यांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना ताब्यात घेतले. दोघांनाही एनडीपीएस कायद्यान्वये अटकही केली. नोव्हेंबर 2020 मध्ये समीरने कॉमेडियन भारती सिंग आणि तिच्या पतीवरही ड्रग्ज प्रकरणी कारवाई केली होती.
advertisement
आर्यन खानला अटक ...
समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने मुंबईतील एका क्रूझवर छापा मारला. यावेळी त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली. या कारवाईने देशभरात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर काही दिवसांत आर्यन खान याला जामीन मिळाला.
नवाब मलिक यांचे आरोप...
आर्यन खानवरील कारवाईनंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या सगळ्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. नवाब मलिक यांनी वानखेडेंविरोधात आरोपांचा धुरळा उडवला होता. यामध्ये समीर वानखेडे यांची जातवैधता ते महागडी लाईफस्टाइल आणि केलेल्या कारवायांबाबत प्रश्न निर्माण झाले होते.
advertisement
सीबीआयकडून गुन्हा दाखल...
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला या प्रकरणात अडकवू नये म्हणून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून वानखेडेवर सीबीआयने गेल्या वर्षी मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. एनसीबीच्या तक्रारीवरून वानखेडे आणि इतरांवर भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट) आणि ३८८ (खंडणीची धमकी) तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
advertisement
आर्यन खान प्रकरणी झालेल्या आरोपानंतर एनसीबीने वानखेडे आणि इतरांविरुद्ध अंतर्गत दक्षता चौकशी केली आणि सीबीआयला सर्व माहिती दिली. त्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे.
राजकारणात एन्ट्री?
मलिक यांनी केलेल्या आरोपानंतर समीर वानखेडे हे आपल्या अमरावतीमधील गावी आणि परिसरात सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. त्याच वेळी समीर वानखेडे हे राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, समीर यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. आता, समीर वानखेडे हे राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
निवडणुकीसाठी धारावीच का?
समीर वानखेडे हे मुंबईतील धारावी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. धारावी मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेल्या. त्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने आता काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार, याकडे लक्ष लागले आहे. तर, दुसरीकडे समीर वानखेडे हे अनुसूचित जातीतील आणि मुस्लिम असल्याने त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्यामुळे महायुतीपासून दुरावलेला मुस्लिम मतदार पुन्हा त्यांच्याकडे वळेल अशी अटकळ आहे. समीर वानखेडे हे आपल्या धडाकेबाज कारवाईने चर्चेत राहिल्याने त्याचाही फायदा त्यांना या मतदारसंघात होऊ शकतो. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत धारावी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अनिल देसाई आघाडीवर होते. आता, विधानसभा निवडणुकीसाठी समीर वानखेडे यांना उमेदवारी दिल्यास मविआच्या समीकरणांना धक्का बसू शकतो.
advertisement
इतर संबंधित बातमी:
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 17, 2024 1:11 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Sameer Wankhede : धडाकेबाज कारवाई ते आरोपांचा धुरळा, समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात का?









