मेट्रोतून उतरून थेट लोकल पकडायची, मुंबईतील ही मेट्रो आता रेल्वे स्टेशनला जोडणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mumbai News: लोकल आणि मेट्रोचं जाळं वाढत असल्याने मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ होत आहे. आता या ठिकाणी मेट्रो ते रेल्वे स्टेशन थेट जोडणी होणार आहे.
मुंबई: मंडाळे ते डी. एन. नगर या मेट्रो ‘2 बी’ मार्गिकेची वांद्रे रेल्वे स्थानकाशी जोडणी लवकरच सुलभ होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रवाशांच्या सोयीसाठी 278 मीटर लांबीचा अत्याधुनिक पादचारी पूल उभारण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी तब्बल 41 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या पुलामुळे मेट्रो स्थानकातून थेट वांद्रे रेल्वे स्थानकात कोणत्याही अडथळ्याविना पोहोचणे शक्य होईल.
मंडाळे ते डी. एन. नगर असा प्रवास करणाऱ्या मेट्रो ‘2 बी’ मार्गिकेचा पहिला टप्पा याच महिन्यात प्रवाशांसाठी सुरू करण्याची तयारी सुरू आहे. पुढील वर्ष–दी दीड वर्षांत पूर्ण मार्गिका कार्यान्वित करण्याचा ‘एमएमआरडीए’चा प्रयत्न असून, भविष्यात मेट्रोचा वापर वाढणार हे लक्षात घेऊन स्थानकांदरम्यानची जोडणी अधिक कार्यक्षम करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
advertisement
वांद्रे परिसरातील एस. व्ही. रोड हा सदैव वाहनांनी गजबजलेला असतो. मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या आणखी वाढेल आणि त्यानुसार रस्त्यावरील वाहतुकीवर अधिक ताण येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पादचारी पुलामुळे पायी चालणाऱ्या प्रवाशांची हालचाल सुलभ होईल आणि स्टेशनबाहेरील गर्दीही मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापनातही सुधारणा अपेक्षित आहे.
advertisement
प्रवाशांच्या सोयीसाठी पुलावर दोन सरकते जिने (एस्केलेटर्स) बसवले जाणार असून, एका ठिकाणी प्रवेश आणि निर्गमनाची सोय उपलब्ध असणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पुलावर 13 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, ज्यामुळे गर्दीचे नियोजन तसेच सुरक्षा व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.
कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, निवडलेल्या कंत्राटदाराला 18 महिन्यांत पादचारी पूल पूर्ण करण्याची अट असेल. बांधकामापूर्वी परिसरातील सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करण्याची जबाबदारीही कंत्राटदारालाच पार पाडावी लागणार आहे.
advertisement
नवीन पादचारी पूल उभारला गेल्यानंतर वांद्रे परिसरातील प्रवाशांना मेट्रो आणि रेल्वे यांदरम्यानचे अंतर सहज पार करता येईल. वाहतूक, गर्दी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे मेट्रो ‘2 बी’ मार्गिकेचा प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि सुसंगत होणार असल्याबाबत ‘एमएमआरडीए’कडून विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 12:52 PM IST


