मी तेव्हाच सांगितलं होतं...; अजितदादा, शरद पवार भेटीचा राज ठाकरेंकडून समाचार
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक झाली होती. या बैठकीवर आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 14 ऑगस्ट, विशाल पाटील : दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवार यांची गुप्त बैठक पार पडली. पुण्यातील एका उद्योजकाच्या बंगल्यात ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. आता यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. सर्व एकमेकांना मिळालेले असल्याचा खोचक टोला या भेटीवरून राज ठाकरे यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे. हे एकमेकांना मिळालेले आहेत. मी आधीच तुम्हाला बोललो होतो त्यांची एक टीम गेली आणखी एक टीम जाईल. आपल्या राज्याची प्रतारणा होणार नाही, याची काळजी आमच्या पक्षाकडून घेतली जाईल अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी या भेटीवर दिली आहे.
advertisement
महापालिका निवडणुकीवर प्रतिक्रिया
महापालिकांच्या निवडणुका लांबल्या आहेत, यावर देखील राज ठाकरे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. आताची राजकीय परिस्थिती पाहाता महापालिका निवडणुका होतील असं वाटत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आजच्या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर चर्चा झाली अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकीसाठी मनसे महायुतीसोबत जाऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. त्यातच गेल्यावेळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली होती, त्या बैठकीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असा सूर उमटला होता. यावर बोलताना युती आघाडीबाबतचा निर्णय मी घेईल सध्या पक्ष वाढवणं महत्त्वाचं असल्याचा सल्ला राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं वृत्तही समोर येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 14, 2023 1:27 PM IST









