Mumbai Manja Accident : कुटुंबाशी गप्पा मारून कामावर निघाले; ब्रिजवरुन जात असताना मांजाने गळा कापला
Last Updated:
Manja Accident : अंधेरी उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा चायनीज मांजामुळे गळा चिरला जाऊन तो गंभीर जखमी झाला आहे. मांजामुळे झालेली जखम खोलवर असून या धक्कादायक घटनेमुळे शहरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मुंबई : मकरसंक्रांतीच्या काळात पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या नॉयलॉन किंवा चायनीज मांज्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत, अशातच अंधेरी उड्डाणपुलावर दुचाकीने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या गळ्याभोवती मांजा अडकून तो गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ब्रिजवरून जाताना मांजाने चिरला गळा
बोरीवली येथे राहणारे भारत कदम (वय 45) हे नेहमीप्रमाणे दुचाकीने सांताक्रूझ येथील कार्यालयात जात होते. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास ते अंधेरी उड्डाणपुलावरून जात असताना अचानक हवेत लटकलेला नॉयलॉन मांजा त्यांच्या गळ्याभोवती अडकला. मांज्यामुळे त्यांच्या गळ्याला खोलवर जखम झाली आणि रक्त वाहण्यास सुरूवात झाली.
स्वतःच भावाला कळवला मृत्यूचा थरार
या घटनेनंतर भारत कदम यांनी स्वतः आपल्या भावाला फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी जवळच्या रिक्षामधून सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय गाठले. रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले.
advertisement
गळ्याला झालेली जखम अत्यंत गंभीर असल्याने प्लास्टिक सर्जनसह इतर तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आले. जखम श्वसननलिकेपर्यंत खोल होती.मात्र सुदैवाने श्वासनळीला कोणतीही इजा झाली नाही. गळ्याच्या दोन्ही बाजूंना जखमा झाल्याने अनेक टाके घालावे लागले. सध्या भारत कदम यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दुचाकी उचलून अंधेरी वाहतूक चौकीत नेण्यात आली. उड्डाणपुलावरील खांबाला अडकलेला मांजा काढून तो अंधेरी पोलिसांकडे देण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंधेरी पोलीस करत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 11:38 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Manja Accident : कुटुंबाशी गप्पा मारून कामावर निघाले; ब्रिजवरुन जात असताना मांजाने गळा कापला









