Mumbai Local: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, लवकरच एसी लोकलच्या जादा फेऱ्या, कधी आणि कुठं? संपूर्ण वेळापत्रक
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Local: सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकूण 8 वातानुकूलित रेक उपलब्ध आहेत. या रेकच्या सहाय्याने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज 109 एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येतात.
मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित (AC) लोकल ट्रेनना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस या लोकलमधील गर्दी वाढत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत एसी लोकलमधील प्रवासी संख्या वाढल्याने जादा फेऱ्या सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर 26 जानेवारीपासून वातानुकूलित लोकलच्या 12 अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे सध्या धावणाऱ्या एसी लोकल फेऱ्यांची संख्या 109 वरून 121 इतकी वाढणार आहे. तसेच शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी चालवण्यात येणाऱ्या वातानुकूलित लोकलची संख्या 65 वरून 77 इतकी होणार आहे.
advertisement
सध्या पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात एकूण 8 वातानुकूलित रेक उपलब्ध आहेत. या रेकच्या सहाय्याने सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज 109 एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येतात. नव्या निर्णयानंतर ही संख्या वाढून 121 होईल. यामध्ये सकाळच्या वेळेत 4 फेऱ्या, तर सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत 8 फेऱ्या धावतील. या अतिरिक्त फेऱ्यांमध्ये 5 जलद (फास्ट) आणि 7 धीम्या (स्लो) लोकलचा समावेश करण्यात आला आहे.
advertisement
अप मार्गावर
पहाटे 5.14 वाजता गोरेगाव ते चर्चगेट (धिमी), सकाळी 7.25 वाजता बोरिवली ते चर्चगेट (जलद), सकाळी 10.08 वाजता विरार ते चर्चगेट (जलद), दुपारी 12.44 वाजता भाईंदर ते चर्चगेट (जलद), दुपारी 3.45 वाजता विरार ते चर्चगेट (धिमी) आणि सायंकाळी 7.06 वाजता गोरेगाव ते चर्चगेट (धिमी).
डाऊन मार्गावर
सकाळी 6.14 वाजता चर्चगेट ते बोरिवली (धिमी), सकाळी 8.27 वाजता चर्चगेट ते विरार (जलद), सकाळी 11.30 वाजता चर्चगेट ते भाईंदर (जलद), दुपारी 1.52 वाजता चर्चगेट ते विरार (धिमी), सायंकाळी 5.57 वाजता आणि रात्री 8.07 वाजता चर्चगेट ते गोरेगाव (धिमी) अशा वातानुकूलित लोकल धावणार आहेत.
advertisement
या अतिरिक्त एसी लोकल फेऱ्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार असून पश्चिम रेल्वे मार्गावरील गर्दीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 7:56 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, लवकरच एसी लोकलच्या जादा फेऱ्या, कधी आणि कुठं? संपूर्ण वेळापत्रक









