जैसलमेरमध्ये 10 मिनिटांत 6 स्फोट, बाडमेरमध्येही ड्रोन हल्ला, जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
India-Pakistan Conflict: राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यात जैसलमेरमध्ये शनिवारी मध्यरात्री १० मिनिटांत अचानक सहा मोठे स्फोट ऐकू आले, तर बाडमेरमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे घबराट पसरली.
जैसलमेर: राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यात जैसलमेरमध्ये शनिवारी मध्यरात्री १० मिनिटांत अचानक सहा मोठे स्फोट ऐकू आले, तर बाडमेरमध्ये ड्रोन हल्ल्यामुळे घबराट पसरली. यानंतर दोन्ही जिल्ह्यांच्या परिसरात सायरन वाजू लागले. या घटनांकडे पाकिस्तानने अलीकडेच केलेल्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन म्हणून पाहिले जात आहे. यावर अद्याप लष्कर आणि प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा संस्था परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
स्थानिक रहिवाशांच्या मते, हे स्फोट त्याच ठिकाणी आणि त्याच पॅटर्ननुसार झाले, जिथे दोन दिवसांपूर्वी अशाच प्रकारचे आवाज ऐकू आले होते. यापूर्वी, जैसलमेरच्या लाठी भागात तीन मोठे स्फोट ऐकू आले होते. हे स्फोटे इतके भयंकर होते की, याचा आवाज तब्बल ५० किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. त्याचप्रमाणे पोखरणमधील धंधू, उग्रस आणि सातवार या गावात स्फोट झाल्याची माहिती मिळाली, जिथे क्षेपणास्त्रासारखी वस्तू पडल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
या घटनांनंतर, जैसलमेरसह राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने रात्री ८:३० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत संपूर्ण वीज बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. ज्यामध्ये घरांचे लाईट बंद ठेवण्याचे आणि अनावश्यकपणे बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा भारत आणि पाकिस्तानने अलीकडेच युद्धबंदी करारावर सहमती दर्शवली होती, परंतु त्यानंतर काही तासांतच, पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे वृत्त समोर आले. युद्धबंदीचा करार केल्यानंतर अवघ्या काही तासांत पुन्हा एकदा पाकिस्तानकडून हल्ले केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढताना दिसत आहे.
Location :
Jaisalmer,Rajasthan
First Published :
May 11, 2025 6:56 AM IST
मराठी बातम्या/देश/
जैसलमेरमध्ये 10 मिनिटांत 6 स्फोट, बाडमेरमध्येही ड्रोन हल्ला, जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट