कर्जासाठी जमीन विकली, तेच आज महाराष्ट्राचे स्मार्ट शेतकरी! साडेतीन लाख जणांना दिले शेतीचे धडे
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Natural Farming: महाराष्ट्राचे स्मार्ट शेतकरी सुभाष शर्मा यांनी आतापर्यंत साडेतीन लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले आहे.
शेतकरी आत्महत्येची सर्वात जास्त आकडेवारी ही विदर्भातील काही निवडक जिल्ह्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यांत तर अनेक शेतकरी कर्जापायी आत्महत्या करतात. अशातच तर एखादा शेतकरी आपले साम्राज्य उभे करत असेल तर आश्चर्यच आहे. यवतमाळ येथील प्रगतशील शेतकरी म्हणून सुभाष शर्मा यांची देशभरात ओळख आहे. कारण त्यांच्या बहुपीक पद्धतीचा आणि नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार सर्वत्र झालेला आहे.
advertisement
सुभाष शर्मा यांनी डोक्यावर कर्जाचा भार असताना देखील आपले शेतीचे साम्राज्य उभे केले. कोणत्याही कठीण परिस्थिती मधून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधला तर तो यशाचा असतो आणि पळवाट काढली तर ती सर्वनाशाची असते, हे सुभाष शर्मा यांनी सिद्ध करून दाखवले. लोकल18 सोबत बोलताना शर्मा यांनी आपल्या शेतीची माहिती दिलीये.
advertisement
शर्मा सांगतात की, “माझ्याकडे डोरली गावात 16 एकर वडिलोपार्जित शेती होती. माझे वडीलही शेती करत होते. त्यामुळे शेतीमधील सर्वच कामे मी माझ्या वडिलांकडून शिकलो. मात्र, काही काळानंतर वडिलांचे निधन झाले आणि सर्व जबाबदारी माझ्यावर आली. अशातच काही कारणास्तव मला गावातील जमीन विकण्याचा निर्णय घ्यावा लागला.”
advertisement
जमीन विकेल्या पैशातून मी दुसऱ्या ठिकाणी 16 एकर जमीन खरेदी केली. जमीन तर खरेदी केली, पण इतर कर्जाचा डोंगर डोक्यावर होताच. त्याच काळात अनेक शेतकऱ्यांनी आमच्या जिल्ह्यांत आत्महत्या केल्या होत्या. मी मात्र खचलो नाही, जिद्द ठेवली आणि काहीही झालं तरी आत्महत्या करायची नाही हा निर्णय घेतला. शेती करायला सुरवात केली. मात्र, रासायनिक शेतीला खर्च खूप लागत होता. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्याने त्यातही निराशा झाली.
advertisement
शर्मा सांगतात पुढे की, त्याचवेळी खूप विचार केल्यानंतर जागतिक नैसर्गिक शेतीचे प्रणेते मासानोबू फूकुओका, भास्कर सावे यांचे नाव माझ्या डोक्यात आले. त्यानंतर यांनी वापरलेल्या शेती पद्धतीचा अभ्यास सुरू केला आणि त्यावर अंमलबजावणी करायला सुरवात केली. तेव्हापासून मला शेतीमध्ये भरभराट होण्यास सुरवात झाली.
advertisement
सर्वात आधी मी शेतातील पाण्याची व्यवस्था केली. बोरू, चवळी, बाजारा या पिकांची लागवड केली. काही पिकं ही आपल्यासाठी तर काही पिकं जमिनीसाठी या तत्त्वावर मी लागवड केली आहे. जमिनीतून जर चांगले उत्पन्न पाहिजे असेल तर माती सशक्त असणे गरजेचे आहे. नैसर्गिक शेती करायची असेल तर गोसंवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे. पाणी, खत, बियाणे आणि शेतीचे नियोजन याचा मेळ साधता आला की शेती मधून भरभराट होतेच, असं शर्मा सांगतात.
advertisement
तूर, हरभरा, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, वाल, हळद, वांगे, मेथी ही सर्व पिकं शेतात आहेत. याचबरोबर कडुलिंब, सीताफळाची देखील झाडे आहे. त्यामुळे पक्षी येतात, पक्षी शेतात असतील तर किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते. आजपर्यंत मी साडेतीन लाख शेतकऱ्यांना नौसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन केले आहे. 2019 मध्ये मला महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी म्हणून देखील गौरविण्यात आले आहे, असे शर्मा सांगतात. (प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी)


