काका-पुतण्या अन् आत्या-भाचीत चुरस, तर कुठं मावस भावांतच सामना, या नगरपालिकेत हायहोल्टेज ड्रामा!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vaijapur Election 2025: काका-पुतण्या, आत्या-भाची, मावसभाऊ, बाप-लेक, आणि पती-पत्नी असे अनेक नातलग एकमेकांविरुद्ध किंवा वेगवेगळ्या प्रभागांतून आपलं नशीब आजमावत आहेत.
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात यंदा नात्या-गोत्याच्या चुरशीच्या लढतींमुळे शहराचं वातावरण चांगलंच तापलं आहे. काका-पुतण्या, आत्या-भाची, मावसभाऊ, बाप-लेक आणि पती-पत्नी असे अनेक नातलग एकमेकांविरुद्ध किंवा वेगवेगळ्या प्रभागांतून आपलं नशीब आजमावत आहेत. या कौटुंबिक लढतींनी मतदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रमुख लढती
आत्या विरुद्ध भाची (प्रभाग क्र. 1 ब): भाजपच्या मसिरा शेख विरुद्ध शिवसेनेच्या सुमैया शेख या आत्या-भाचीमध्ये तुल्यबळ लढत होत आहे.
काका विरुद्ध पुतण्या (प्रभाग क्र. 3): राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ) रियाज शेख (माजी नगरसेवक आणि मुरलेले राजकारणी) आणि शिवसेनेचे मिरान शेख (नवखे पण चांगली टक्कर देणारे) यांच्यातील लढतीकडे संपूर्ण शहराचे डोळे लागले आहेत. हा दोघांचाही 'होमपिच' प्रभाग असल्याने अत्यंत चुरस पाहायला मिळत आहे.
advertisement
मावसभाऊ (प्रभाग क्र. 10): शिवसेनेचे हमीद कुरेशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ) अकील कुरेशी या मावसभावांमध्ये थेट सामना होत आहे.
नातलग महिला उमेदवार (प्रभाग क्र. 7 ब): शिवसेनेच्या ललिता साळुंके आणि भाजपच्या सविता चव्हाण या नातलग महिलांमध्ये जोरदार टक्कर सुरू आहे.
advertisement
युतीतही 'मैत्रीपूर्ण' संघर्ष
प्रभाग क्रमांक 11 अ मध्ये एक विशेष लढत पहायला मिळत आहे. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची युती असूनही, भाजपचे दशरथ बनकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुंडलिक गायकवाड या 'सोयऱ्यांनी' स्वतंत्रपणे निवडणूक लढवत 'मैत्रीपूर्ण लढतीचा' निर्णय घेतला आहे. यामुळे युतीतील पक्षांतर्गत समीकरणेही चर्चेत आली आहेत.
एकाच घरातून अनेक उमेदवार
निवडणुकीत अनेक कुटुंबं आपलं राजकीय वजन पणाला लावत आहेत. शिवसेनेचे साबेर खान आणि मुलगा ताहेर खान वेगवेगळ्या प्रभागातून रिंगणात आहेत.
advertisement
भाजपचे प्रकाश चव्हाण आणि पत्नी चित्रा चव्हाण हे देखील वेगवेगळ्या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. दोघांपैकी कोण निवडून येईल हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल.
शिवसेनेच्या डॉ. विजया डोंगरे आणि ज्योती डोंगरे या सख्ख्या जावा वेगवेगळ्या प्रभागांतून आपलं नशीब आजमावत आहेत.
नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी कॉर्नर सभा आणि बैठकांनी गाजत आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे डॉ. दिनेश परदेशी, शिवसेनेचे संजय बोरनारे आणि काँग्रेस आघाडीचे सुभाष गायकवाड यांच्यात कांटे की टक्कर सुरू आहे. एकंदरीतच, यंदा वैजापूरच्या निवडणुकीत नात्यांमधील ओढ आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांचा संगम पहायला मिळत आहे. या चुरशीच्या लढतींमध्ये मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 26, 2025 12:12 PM IST
मराठी बातम्या/Politics/
काका-पुतण्या अन् आत्या-भाचीत चुरस, तर कुठं मावस भावांतच सामना, या नगरपालिकेत हायहोल्टेज ड्रामा!









