ती गेली पण तिघांचा जीव वाचवला; मृत्यूच्या दारात जपली माणुसकी, पुण्यातील हृदयस्पर्शी घटना
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
पुण्यातील एका 70 वर्षीय मेंदूमृत महिलेच्या अवयवदानातून तिघांना नवं जीवनदान मिळालं आहे. या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे तिघांना नवे आयुष्य मिळाले आहे.
पुणे: अवयवदानातून अनेकांना नवीन आयुष्य मिळू शकतं. याचाच प्रत्यय देणारी एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील एका 70 वर्षीय मेंदूमृत महिलेच्या अवयवदानातून तिघांना नवं जीवनदान मिळालं आहे. या महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे तिघांना नवे आयुष्य मिळाले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे यकृत आणि दोन मूत्रपिंडांचे यशस्वी प्रत्यारोपण शक्य झाले आहे.
महिलेच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान
बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात एका वृद्ध महिलेला बेशुद्ध अवस्थेत आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने व्हेंटिलेटरची मदत देत उपचार सुरू केले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासण्यांमध्ये महिलेच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे समोर आले.
डॉक्टरांनी ही दुखापत अत्यंत गंभीर असून मेंदू पुन्हा पूर्ववत होण्याची शक्यता कमी असल्याची माहिती नातेवाइकांना दिली. रुग्णालयातील डॉक्टर आणि झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या समन्वयकांनी कुटुंबीयांशी संवाद साधत मेंदूमृत रुग्णाच्या अवयवदानाबाबत माहिती दिली. नातेवाइकांनी सकारात्मक निर्णय घेत अवयवदानासाठी संमती दिल्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
advertisement
रुग्णाची प्रकृती नियंत्रित ठेवण्यासाठी तिला अत्याधुनिक जीवनरक्षक उपचारांवर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी आणि अवयवांपर्यंत होणारा रक्तपुरवठा यावर सातत्याने लक्ष ठेवत आवश्यक ती वैद्यकीय प्रक्रिया सुरू ठेवली. यानंतर झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरच्या समन्वयातून प्रतीक्षा यादीतील योग्य रुग्णांची निवड करण्यात आली.
महिलेचे यकृत आणि दोन मूत्रपिंडे तीन रुग्णांना प्रत्यारोपणासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे यकृत आणि दोन मूत्रपिंडांचे यशस्वी प्रत्यारोपण शक्य झाले असून तिघांना नवे आयुष्य मिळाले आहे. या घटनेमुळे अवयवदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 9:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
ती गेली पण तिघांचा जीव वाचवला; मृत्यूच्या दारात जपली माणुसकी, पुण्यातील हृदयस्पर्शी घटना








