आयटीमधील नोकरी सोडली, वाचनसंस्कृतीसाठी पुण्यातील दाम्पत्याचा अनोखा उपक्रम, Video पाहून कराल कौतुक
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पुण्यातील ऋतिका आणि आशय वाळंबे या उच्चशिक्षित दाम्पत्याने वाचन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे.
पुणे : डिजिटल युगात वाचनसंस्कृती मागे पडत चालली असताना, पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या ऋतिका आणि आशय वाळंबे या उच्चशिक्षित दाम्पत्याने वाचन चळवळ जिवंत ठेवण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. आयटी क्षेत्रातील नोकऱ्या सोडून त्यांनी पुस्तकवाले बुक स्टोअर इन व्हील्स या नावाने एक सामाजिक स्टार्टअप उभारले असून, आज हा उपक्रम राज्यभरात वाचनप्रेमींमध्ये लोकप्रिय झाला आहे.
कोरोना काळात 2020 मध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली. त्या काळात लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले होते आणि पुस्तकांच्या दुकानांपर्यंत पोहोचणेही शक्य नव्हते. अशा परिस्थितीत पुस्तके थेट वाचकांच्या दारापर्यंत पोहोचवायची ही कल्पना वाळंबे दाम्पत्याच्या मनात आली. सुरुवातीला केवळ तीन सुटकेसमधील पुस्तकांपासून हा प्रवास सुरू झाला. आज मात्र ही संख्या तब्बल 25 सुटकेसपर्यंत पोहोचली आहे.
advertisement
ऋतिका वाळंबे या व्यावसायिक कमर्शियल आर्टिस्ट असून आशय वाळंबे आयटी क्षेत्रात कार्यरत होते. सुरुवातीला त्यांनी हा उपक्रम केवळ विकेंड ॲक्टिव्हिटी म्हणून सुरू केला. शनिवार-रविवारी पुण्यातील विविध हौसिंग सोसायट्यांमध्ये पुस्तकांचे स्टॉल लावले जात. मात्र या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद पाहून यामध्ये मोठी संधी असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पूर्णवेळ या उपक्रमात झोकून दिले.
advertisement
पुस्तकवाले उपक्रमांतर्गत बुक ट्रकच्या माध्यमातून हौसिंग सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, कॉर्पोरेट कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये पुस्तक प्रदर्शने भरवली जातात. पुण्यासह ठाणे, मुंबई, सांगली आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये आतापर्यंत 1500 हून अधिक पुस्तक प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. या माध्यमातून 11 लाखाहून अधिक वाचक पुस्तकवाले शी जोडले गेले असून, 1.2 लाखांहून अधिक पुस्तके विकली गेली आहेत.
advertisement
या स्टॉलवर लहान मुलांसाठीची बालपुस्तके, तरुण आणि प्रौढांसाठी फिक्शन, नॉन-फिक्शन, आत्मचरित्रे, कथा, कादंबऱ्या, ऐतिहासिक आणि वैचारिक साहित्य अशा सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध असतात. एका स्टॉलवर साधारण 3 ते 4 हजार पुस्तके ठेवली जातात.
पुस्तकवाले ही केवळ व्यावसायिक संकल्पना नसून एक सामाजिक चळवळ आहे. या उपक्रमात 18 ते 25 वयोगटातील 50 हून अधिक तरुण स्वयंसेवक EARN & LEARN कार्यक्रमांतर्गत कार्यरत आहेत. पुस्तक विक्रीतून मिळणारे उत्पन्न या तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वापरले जाते, त्यामुळे त्यांना रोजगारासोबतच वाचनाची गोडीही लागते.
advertisement
ही सगळी पुस्तकांची पुण्याई आहे. आम्ही फक्त लोकांपर्यंत पुस्तके पोहोचवणारे माध्यम आहोत. वाचनसंस्कृती अधिक बळकट व्हावी, हीच आमची खरी प्रेरणा आहे, असे मत ऋतिका वाळंबे यांनी व्यक्त केले.
डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कमी झालेले नाही, हे पुस्तकवाले या उपक्रमाने सिद्ध करून दाखवले आहे. वाचनसंस्कृती टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी वाळंबे दाम्पत्याने उचललेले हे पाऊल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 3:37 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आयटीमधील नोकरी सोडली, वाचनसंस्कृतीसाठी पुण्यातील दाम्पत्याचा अनोखा उपक्रम, Video पाहून कराल कौतुक








