Ajit Pawar : अपघाताआधीचे ते 3 शब्द अन् काळाचा घाला; विमानात बसताना अजित पवारांनी केलेला 'तो' कॉल ठरला अखेरचा
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
ज्या नेत्याला हसतमुख पाहण्यासाठी गुजर तिथे उभे होते, त्यांच्याच डोळ्यांसमोर विमानाचा भीषण अपघात झाला.
बारामती: "मी विमानात बसतोय..." अजितदादांच्या आवाजातील हे तीन शब्द शेवटचे ठरतील, असं कोणालाही वाटलं नव्हतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळत असतानाच, त्यांचे अत्यंत जवळचे स्नेही किरण गुजर यांनी सांगितलेला विमानाचा थरार अंगावर काटा आणणारा आहे. दादांना घेण्यासाठी विमानतळावर उभ्या असलेल्या गुजर यांच्या डोळ्यांसमोरच काळाने घाला घातला आणि महाराष्ट्राचा 'झंझावात' शांत झाला.
विमानात बसण्यापूर्वीचा तो शेवटचा फोन
बुधवारी सकाळी दादांचा प्रवास नेहमीप्रमाणेच धावपळीचा होता. विमानात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी किरण गुजर यांना फोन केला. केवळ "मी विमानात बसतोय" एवढेच ते बोलले. हा निरोप देऊन दादा बारामतीकडे झेपावले, पण हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरेल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
डोळ्यांसमोरच विमानाचा चक्काचूर
किरण गुजर दादांना रिसिव्ह करण्यासाठी बारामती विमानतळावर सज्ज होते. धावपट्टीच्या जवळ असताना विमानाने लँडिंगचा प्रयत्न केला, पण काहीतरी बिनसलं आणि बघता बघता विमानाचा अपघात झाला. ज्या नेत्याला हसतमुख पाहण्यासाठी गुजर तिथे उभे होते, त्यांच्याच डोळ्यांसमोर विमानाचा भीषण अपघात झाला.
advertisement
"मी ओळखलं, हे दादाच आहेत..."
अपघातानंतरचा तो प्रसंग सांगताना किरण गुजर यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, "अपघातानंतर जेव्हा मदतकार्य सुरू झालं आणि मृतदेह गाडीत ठेवला जात होता, तेव्हा मी पाहिलं आणि ओळखलं की हे आमचे दादाच आहेत. मला क्षणभर वाटलं की मी एखादं अतिशय वाईट स्वप्न पाहतोय. आपण झोपेतून जागे व्हावे आणि हे सगळं खोटं असावं, असं वाटत होतं. पण दुर्दैवाने ते वास्तव होतं."
advertisement
दादांच्या प्रत्येक सुख-दु:खात सोबत असणारे किरण गुजर आज पूर्णपणे खचले आहेत. दादांच्या त्या शेवटच्या तीन शब्दांनी आणि डोळ्यांसमोर घडलेल्या त्या भयावह दृश्याने गुजर यांच्यासह संपूर्ण बारामतीवर कधीही न पुसले जाणारे दुःख ओढवले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 11:06 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Ajit Pawar : अपघाताआधीचे ते 3 शब्द अन् काळाचा घाला; विमानात बसताना अजित पवारांनी केलेला 'तो' कॉल ठरला अखेरचा








