डोळ्यात टाकली मिरची पूड; मग दगडानं ठेचून सासरे आणि मेहुणीची हत्या, जावयाला कोर्टाने घडवली आयुष्यभराची अद्दल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
ही सर्व जमीन आपल्याच ताब्यात यावी आणि आपल्या धाकट्या मेहुणीशी, शीतलशी आपला विवाह व्हावा, अशी विशालची धारणा होती. मात्र, सासरे रमेश बाराते आणि मेहुणी शीतल यांनी या गोष्टीला प्रखर विरोध दर्शवला होता
पुणे : दौंड तालुक्यातील हिंगणगाडा येथे शेतजमीन आणि विवाहाच्या वादातून सासरा आणि मेहुणीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील नराधम जावयासह त्याच्या दोन साथीदारांना बारामती जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात न्यायालयाने विशाल सोपान वत्रे, जयदीप जयराम चव्हाण आणि केरबा नारायण मेरगळ या तिघांना दोषी ठरवत आजन्म कारावास आणि प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. २०१६ मध्ये घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
या भीषण गुन्ह्यामागे संपत्तीचा लोभ आणि अवाजवी हव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. आरोपी विशाल वत्रे याच्या सासऱ्यांच्या नावे १६ एकर शेतजमीन होती. ही सर्व जमीन आपल्याच ताब्यात यावी आणि आपल्या धाकट्या मेहुणीशी, शीतलशी आपला विवाह व्हावा, अशी विशालची धारणा होती. मात्र, सासरे रमेश बाराते आणि मेहुणी शीतल यांनी या गोष्टीला प्रखर विरोध दर्शवला होता. याच रागातून विशालने आपल्या सासऱ्यांचा आणि मेहुणीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यासाठी जयदीप चव्हाण आणि केरबा मेरगळ या दोन साथीदारांना सुपारी दिली.
advertisement
२२ मार्च २०१६ रोजी विशालने या दोघांना जेवणाच्या निमित्ताने घरी बोलावले. यानंतर कटानुसार ते मोटारसायकलवरून घरी परतत असताना हिंगणगाडा शेतशिवारात दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी प्रथम बाप-लेकीच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली आणि त्यानंतर दगड आणि कोयत्याने वार करून दोघांची जागीच हत्या केली.
advertisement
या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी वकील ॲड. स्नेहल नाईक यांनी मांडलेला युक्तिवाद आणि तपासण्यात आलेल्या २० साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयाने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या. पुराव्यांची साखळी आणि तपासी अधिकाऱ्यांचे जबाब ग्राह्य धरत न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपींना खुनाच्या गुन्ह्याखाली ही शिक्षा सुनावली. या खटल्याच्या यशस्वी निकालासाठी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 11:43 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
डोळ्यात टाकली मिरची पूड; मग दगडानं ठेचून सासरे आणि मेहुणीची हत्या, जावयाला कोर्टाने घडवली आयुष्यभराची अद्दल











