Pimpri News : रॅम्पचं उद्घाटन झालं, पण रस्ता अद्याप अधांतरी; चिंचवडकर त्रस्त

Last Updated:

Pimpari-Chinchwad News : संत मदर तेरेसा उड्डाणपुलासाठी रॅम्पचं काम पूर्ण होऊन उद्घाटनही झालं आहे. मात्र, संलग्न रस्ता अद्याप अधांतरी असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

News18
News18
पिंपरी : पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जाणारा संत मदर तेरेसा उड्डाणपुलावरील रॅम्प आणि चिंचवड-थेरगाव बटरफ्लाय ब्रिज वापरासाठी तयार झाला आहे. परंतू, या दोन्ही सुविधा नागरिकांच्या प्रत्यक्ष उपयोगात येण्यासाठी आवश्यक असलेला जोडरस्ता अद्याप अपूर्णच आहे. परिणामी या भागातील हजारो प्रवाशांना मोठा वळसा घ्यावा लागत असून त्रास सहन करावा लागत आहे.
हा रस्ता चिंचवडगाव स्मशानभूमीजवळील केशवनगर भागातून बटरफ्लाय ब्रिजपर्यंत जाणारा असून, सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा आणि 18 मीटर रुंद आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून भूसंपादनाच्या प्रक्रियेमुळे अडकलेले आहे. त्यामुळे रॅम्प आणि ब्रिजचा प्रत्यक्ष फायदा नागरिकांना मिळत नाही.
रस्ता पूर्ण झाल्यास चिंचवडगाव, केशवनगर, थेरगाव, काळेवाडी फाटा, चिखली, वाकड, रहाटणी, चिंचवड स्टेशन या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण सध्या हा रस्ता अपूर्ण असल्याने वाहनचालकांना 5 ते 7 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत आहे. यामुळे वेळेची,इंधनाची नासाडी होत असून वाहतूक कोंडीही वाढते आहे.
advertisement
भूसंपादनातील अडथळेच कारणीभूत
या रस्त्याचा मोठा भाग निळ्या पूररेषेत येतो. त्यामुळे जागा मालकांना महापालिकेकडून टीडीआरच्या स्वरूपात निम्माच मोबदला दिला जात आहे. यामुळे जागा मालकांचा भूसंपादनास तीव्र विरोध आहे. महापालिका प्रशासनाने या समस्येवर कोणताही ठोस तोडगा अद्याप काढलेला नाही. परिणामी गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याचा विषय रखडलेलाच आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यात रस्ता समाविष्ट असूनही भूसंपादन प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी या विषयावर प्रशासनाचे लक्ष वेधले होते.मात्र, प्रत्यक्षात उपाययोजना न झाल्याने 'रॅम्प तयार, पण संलग्न रस्ता कधी?'असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
advertisement
नागरिकांचा दिलासा कधी?
या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास काळेवाडी, चिंचवड आणि वाकड भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत होणार आहे. बटरफ्लाय ब्रिजचा उपयोगही प्रभावीरीत्या होईल. पण भूसंपादन प्रक्रियेला वेग मिळाला नाही, तर हा प्रश्न आणखी काही वर्षे कायम राहील,अशी भीती स्थानिक व्यक्त करत आहेत.
महापालिका प्रशासनाने रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी वाढत आहे. कारण, उड्डाणपुलाचा रॅम्प आणि ब्रिज पूर्ण झाले असले तरी त्यांचा प्रत्यक्ष लाभ रस्त्याशिवाय मिळणे अशक्य आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri News : रॅम्पचं उद्घाटन झालं, पण रस्ता अद्याप अधांतरी; चिंचवडकर त्रस्त
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement