रिक्षात बसलं की कोयता काढायचे, अपहरण अन् लाखोंची लूट; पुण्यात त्या दोघांची दहशत, शेवटी ती रिक्षा दिसली अन्...सिनेमासारखा थरार
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या टोळीने १६ मार्च २०२६ रोजी सूरज शेलार नावाच्या व्यक्तीचे पैशांसाठी अपहरण केले होते. याशिवाय, अवघ्या एक दिवस आधी म्हणजेच १५ मार्चला नाशिक फाटा येथून नितीन महाजन यांना रिक्षात बसवून कोयत्याचा धाक दाखवत त्यांचेही अपहरण केले होते
पिंपरी-चिंचवड : शहरात खंडणीसाठी अपहरण आणि कोयत्याच्या जोरावर जबरी चोरी करणाऱ्या एका खतरनाक टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पवन छगन उजगरे (वय २६) आणि सुमित हनुमंत कराड (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चित्रपटासारखं अपहरण आणि थरार
मिळालेल्या माहितीनुसार, या टोळीने १६ मार्च २०२६ रोजी सूरज शेलार नावाच्या व्यक्तीचे पैशांसाठी अपहरण केले होते. याशिवाय, अवघ्या एक दिवस आधी म्हणजेच १५ मार्चला नाशिक फाटा येथून नितीन महाजन यांना रिक्षात बसवून कोयत्याचा धाक दाखवत त्यांचेही अपहरण केले होते. या गुन्ह्यांमुळे सांगवी आणि भोसरी परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती.
advertisement
पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई
अपहरणाचा कॉल येताच पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. भोसरी एमआयडीसी परिसरातील एका मोकळ्या मैदानात आरोपी दोन रिक्षांसह दबा धरून बसले होते. पोलिसांनी घेराव घालताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी आवश्यक बळाचा वापर करून त्यांना जागीच जेरबंद केले. झडतीमध्ये दोन रिक्षा, दोन तीक्ष्ण कोयते, मोबाईल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील दोन मोठे गुन्हे उघडकीस आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 7:51 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रिक्षात बसलं की कोयता काढायचे, अपहरण अन् लाखोंची लूट; पुण्यात त्या दोघांची दहशत, शेवटी ती रिक्षा दिसली अन्...सिनेमासारखा थरार








