Pimpri-Chinchwad: 6550 कुटुंबांना मिळणार स्वस्तातलं घर, पिंपरी-चिंचवडमध्ये मेगा प्लॅन, कुणाला संधी?
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pimpri Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये हक्काचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे. आता स्वस्तातली 6550 घरे लवकरच तयार होणार आहेत.
पुणे: पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरातील घरांच्या किमती गगनाला भिडल्याने अनेकांना स्वतःचं घर घेणं कठीण झालं आहे. मात्र, आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नऊ ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत 6,550 सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे तब्बल 6,550 कुटुंबांना पक्के आणि हक्काचे घर मिळणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील काही भागांत गृहप्रकल्प उभारले आहेत. मोशीतील बोहाडेवाडी, चिखलीतील चहोली, पिंपरीतील उद्यमनगर आणि आकुर्डीतील मोहननगर येथे हे प्रकल्प पूर्ण झाले असून, एकूण 3 हजार 668 सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (EWS) कुटुंबांना मिळाल्या आहेत. तर डुडुळगाव येथे 1,190 सदनिकांचे बांधकाम सध्या सुरू आहे.
advertisement
दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी
रावेतमधील रद्द झालेला गृहप्रकल्प आता पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पुन्हा समाविष्ट करण्यात आला आहे. या टप्प्यात मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत आणि चोविसावाडी या नऊ ठिकाणी प्रकल्प राबविण्याची महापालिकेची तयारी सुरू आहे. सुधारित विकास आराखड्यात (डीपी) या जागा महापालिकेने आरक्षित ठेवलेल्या आहेत.
advertisement
बेघरांसाठी शहरात तीन ठिकाणी नवे गृहप्रकल्प
शहरातील रावेत, ताथवडे आणि चोविसावाडी या तीन ठिकाणी बेघर नागरिकांसाठी (एचडीएच गट) गृहप्रकल्प उभारले जाणार आहेत. रावेत परिसरात एक जुना प्रकल्प आणि त्यासोबत नवा असा दोन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या नऊ प्रकल्पांत एकूण साडेसहा हजार सदनिका उभारण्याचे नियोजन असून, त्यांची पूर्णता साध्य होण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
Nov 09, 2025 10:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pimpri-Chinchwad: 6550 कुटुंबांना मिळणार स्वस्तातलं घर, पिंपरी-चिंचवडमध्ये मेगा प्लॅन, कुणाला संधी?








