2 वर्षाच्या बाळानं प्यायलं अॅसिड; तोंड, अन्ननलिका जळाली, शेवटी पुण्यातील डॉक्टरांनी केला 'चमत्कार'
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
घरगुती साफसफाईसाठी वापरलं जाणारं ॲसिटिक ॲसिड या मुलाने अनावधानाने प्राशन केलं होतं. यामुळे त्याचे ओठ, तोंड, अन्ननलिका आणि छातीसह शरीराचे अंतर्गत भाग गंभीररीत्या भाजले गेले होते
पुणे: खेळता खेळता पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत असलेलं घातक 'ॲसिटिक ॲसिड' प्यायल्यानं एक दोन वर्षांचं बाळ मृत्यूच्या दारात पोहोचलं. पण मृत्यूशी झुंज देणाऱ्या साताऱ्यातील दोन वर्षांच्या बालकाला पुण्यातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे पुनर्जन्म मिळाला आहे. बालदिनाच्या दिवशी घडलेली ही हृदयद्रावक घटना सगळ्यांनाच हादरवून टाकणारी होती. मात्र, आता मुलाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आलं आहे.
घरगुती साफसफाईसाठी वापरलं जाणारं ॲसिटिक ॲसिड या मुलाने अनावधानाने प्राशन केलं होतं. यामुळे त्याचे ओठ, तोंड, अन्ननलिका आणि छातीसह शरीराचे अंतर्गत भाग गंभीररीत्या भाजले गेले होते. श्वास घेण्यास होणारा त्रास आणि तीव्र वेदनांमुळे मुलाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. सुरुवातीला साताऱ्यात उपचार केल्यानंतर, प्रकृती अधिक बिघडल्याने पुण्यातील अंकुरा हॉस्पिटलचे पथक विशेष रुग्णवाहिकेद्वारे साताऱ्याला पोहोचलं. यानंतर मुलाला पुण्यात हलवण्यात आलं.
advertisement
बालरोग अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. मिलिंद जंवगी यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने या मुलावर उपचार सुरू केले. मुलाच्या शरीरावरील बाह्य जखमांसोबतच 'एंडोस्कोपी'द्वारे तपासणी केली गेली. यावेळी अन्ननलिकेलाही मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे समोर आले होते. हे उपचार अत्यंत आव्हानात्मक होते, कारण एकाच वेळी श्वसनमार्गातील अडथळा, अन्ननलिकेच्या जखमा आणि बाह्य संसर्ग या सर्वांवर नियंत्रण मिळवायचे होते.
advertisement
सुरुवातीला मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि अन्ननलिकेला अधिक त्रास होऊ नये म्हणून नळीद्वारे पोषण देण्यात आलं. हळूहळू प्रकृतीत सुधारणा झाल्यावर आणि गिळण्याची क्रिया पूर्ववत झाल्यावर त्याला तोंडावाटे आहार देण्यास सुरुवात झाली. छाती आणि जांघेवरील रासायनिक जखमांवर विशेष ड्रेसिंग करून आणि चोवीस तास तज्ज्ञांच्या देखरेखीखाली औषधोपचार केल्यामुळे हा चिमुरडा मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर आला आहे. डॉक्टरांच्या या यशस्वी कामगिरीमुळे पालक आणि वैद्यकीय क्षेत्रातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 17, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
2 वर्षाच्या बाळानं प्यायलं अॅसिड; तोंड, अन्ननलिका जळाली, शेवटी पुण्यातील डॉक्टरांनी केला 'चमत्कार'








