'5 कोटी दे, नाहीतर बाबा सिद्दिकी' करू; गोल्डन मॅन सनी वाघचौरेला धमकी, पुण्यात खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
"खंडणी दिली नाही तर बाबा सिद्दिकींसारखी अवस्था करू आणि अंगावर सोन्यापेक्षा जास्त पितळ (गोळ्या) घालू," अशी थेट धमकी मेसेजद्वारे देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड: शहरातील प्रसिद्ध 'गोल्डन मॅन' सनी वाघचौरे यांना लॉरेन्स बिष्णोई गँगच्या नावाने ५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. "खंडणी दिली नाही तर बाबा सिद्दिकींसारखी अवस्था करू आणि अंगावर सोन्यापेक्षा जास्त पितळ (गोळ्या) घालू," अशी थेट धमकी मेसेजद्वारे देण्यात आली आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून वाघचौरे यांनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २५ जानेवारी रोजी सनी वाघचौरे यांना कॅनडातील एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सॲप कॉल आला. समोरच्या व्यक्तीने आपली ओळख बिष्णोई गँगचा सदस्य 'शुभम लोणकर' अशी करून दिली. "गुगलवर सर्च कर आमची गँग कोण आहे, बाकी मेसेजवर बोलतो," असे म्हणून त्याने फोन कट केला.
'५ दिवसांत ५ कोटी द्या, अन्यथा...'
२६ जानेवारी रोजी सायंकाळी वाघचौरे यांना त्याच क्रमांकावरून एक धक्कादायक मेसेज आला. त्यात म्हटले होते की, "तुझ्याकडून ५ कोटी हवे आहेत. तुला जगातील कोणतीही ताकद वाचवू शकत नाही. तुझ्याकडे ५ दिवसांचा वेळ आहे, गोळी कोठूनही येऊ शकते. जर उत्तर दिले नाही तर तुझी अवस्था बाबा सिद्दिकींसारखी करू. जेवढे सोने तू अंगावर घालतोस, त्यापेक्षा जास्त पितळ (गोळ्या) तुझ्या शरीरात भरू."
advertisement
पोलीस तपासाला वेग
या गंभीर धमकीनंतर सनी वाघचौरे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. गुंडा विरोधी पथकाकडून (ANC) या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. हा फोन खरोखरच संबंधित गँगकडून आला आहे की कोणाकडून खोडसाळपणा झाला आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 1:49 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'5 कोटी दे, नाहीतर बाबा सिद्दिकी' करू; गोल्डन मॅन सनी वाघचौरेला धमकी, पुण्यात खळबळ









