Pune Accident : पुणे पुन्हा हादरलं!अंगणात बागडत होता 2 वर्षाचा मयूर; अचानक मृत्यूनं गाठलं, आईचा अंगावर काटा आणणारा आक्रोश
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आईच्या डोळ्यांसमोर घरापुढच्या अंगणात खेळणारा दोन वर्षांचा मयूर. काही क्षणांपूर्वीच त्याचे खिदळणे आणि बागडणे सुरू होते.
पुणे : आईच्या डोळ्यांसमोर घरापुढच्या अंगणात खेळणारा दोन वर्षांचा मयूर. काही क्षणांपूर्वीच त्याचे खिदळणे आणि बागडणे सुरू होते. मात्र, एका बेजबाबदार चाकाने या निरागस बालकाचे आयुष्य आणि एका कुटुंबाचे सुख क्षणात चिरडून टाकले. खराडी परिसरात पिकअप व्हॅनच्या चाकाखाली चिरडून मयूर अमर माळवे या दोन वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, आईच्या आक्रोशाने उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले.
खेळता खेळता काळाचा घाला
पूनम माळवे यांचा दोन वर्षांचा मुलगा मयूर गुरुवारी सायंकाळी घरासमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. तिथेच जवळच गोठा असल्याने दूध वाहतूक करणारे एक पिकअप वाहन तिथे आले. खेळण्याच्या नादात असलेला मयूर ड्रायव्हरच्या लक्षात आला नाही आणि निष्काळजीपणे चालवलेल्या वाहनाचे चाक थेट त्या चिमुरड्याच्या अंगावरून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयूरला पाहून आईने हंबरडा फोडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
advertisement
खराडीत चिमुरड्यांच्या मृत्यूचे सत्र
काही दिवसांपूर्वीच खराडीत एका ५ वर्षांच्या मुलाचा सोसायटीच्या आवारात गाडीच्या धडकेने मृत्यू झाला होता. ती जखम ताजी असतानाच आता २ वर्षांच्या मयूरचा बळी गेल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. "आमच्या मुलांनी खेळायचं कुठे आणि कोणाच्या भरवशावर?" असा आर्त सवाल आता विचारला जात आहे. या प्रकरणातही पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांच्या कारवाईने आरोपीला शिक्षा होईलही, पण माळवे कुटुंबाने आपला 'लाडाचा मयूर' कायमचा गमावला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 12:45 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : पुणे पुन्हा हादरलं!अंगणात बागडत होता 2 वर्षाचा मयूर; अचानक मृत्यूनं गाठलं, आईचा अंगावर काटा आणणारा आक्रोश









