तो काम करण्यात दंग होता; पण अंगावर 'मृत्यू' कोसळला, कोरेगाव पार्कमधील कामगाराचा हृदयद्रावक शेवट
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
काम करत असताना अचानक जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट राहुल गोसावी यांच्या डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले.
पुणे : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात कामादरम्यान घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेत एका कामगाराला आपला जीव गमवावा लागला आहे. जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट डोक्यात पडून ही दुर्घटना घडली आहे. याप्रकरणी जेसीबी चालकाविरुद्ध निष्काळजीपणाने मृत्यूला जबाबदार ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विचित्र घटनेनं खळबळ उडाली आहे
कोरेगाव पार्क भागातील 'डम्पिंग ग्राउंड' परिसरात ही दुर्दैवी घटना सोमवारी (८ डिसेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल अनिल गोसावी (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. काम करत असताना अचानक जेसीबी यंत्राची लोखंडी बकेट राहुल गोसावी यांच्या डोक्यात पडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
advertisement
राहुल गोसावी यांच्या आई कावेरी (वय ५८) यांनी या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे किती उल्लंघन होते, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक निमकर याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. दोषी जेसीबी चालकावर लवकरच कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र, या घटनेमध्ये निष्पाप कामगाराला आपला जीव गमवावा लागल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 10, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
तो काम करण्यात दंग होता; पण अंगावर 'मृत्यू' कोसळला, कोरेगाव पार्कमधील कामगाराचा हृदयद्रावक शेवट









