Pune Lok Sabha Result 2024 : पुण्याचं मैदान मुरलीधर मोहोळांनी मारलं! रवींद्र धंगेकर कुठे पडले कमी?
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pune Lok Sabha Election Result 2024 : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभेला सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर चांगलेच चर्चेत आले होते.
पुणे : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभेला सुरुंग लावल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर चांगलेच चर्चेत आले होते. पुण्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होती. भाजपने महापौर मुरलीधर मोहोळ यांना मैदानात उतरवलं होतं, तर महाविकास आघाडीने काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या रुपाने मोठा डाव आखला होता. मात्र, धंगेकर पॅटर्न पुणे लोकसभेत (Pune Loksabha Election Result) फेल झाला आहे. मुरलीधर मोहोळ 1 लाख 18 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ (BJP Murlidhar Mohol) यांना पहिल्या फेरीपासून आघाडी मिळाली. विशेषतः शहरी भागात मोहोळ यांना मोठ्या प्रमाणात मतदान झालं. शहरी भागातून मतदान मिळवण्यास घंगेकर कमी पडल्याचं पाहायला मिळालं.
पुणे लोकसभा (Pune Loksabha Election) ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र जवळपास 10 वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच 2014 साली भाजपकडे गेली. कधीकाळी हा मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुणे लोकसभेत लढत होते.
advertisement
‘वंचित’, ‘एमआयएम’ फॅक्टर किती महत्त्वाचा?
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे हे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते. मनसेला जय महाराष्ट्र करत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. गेल्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार अनिल जाधव यांना 65 हजार मते मिळाली होती. मात्र, त्यावेळी वंचित आणि ‘एम्आयएम’ हे एकत्र होते. आता ‘एमआयएम्‘ने सुंडके यांना मैदानात उतरवलं होतं. मोरे आणि सुंडके यांनी जास्त मते घेतल्यास मोहोळ यांचा मार्ग सुकर होणार तर ही मते मिळविण्यात धंगेकर यशस्वी झाल्यास मोहोळ यांच्या अडचणीत वाढ होणार असं काहीसं गणित राजकीय विश्लेषकांनी बांधलं होतं.
advertisement
आतापर्यंत 3 नगरसेवक संसदेत
पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, 1991 च्या लोकसभा निवडणुकीत याला पहिल्यांदा सुरुंग लागला. अण्णा जोशी यांच्या माध्यमातून भाजपचा पहिला खासदार पुण्यात निवडून आला. 2014 मध्ये अनिल शिरोळे यांनी काँग्रेसचे विश्वजीत कदम यांचा पराभव केल्यानंतर तेव्हापासून पुण्यावर भाजपचे वर्चस्व आहे. 2019 मध्ये गिरीश बापट हे निवडून आले. बापट यांच्या निधनामुळे भाजपने मोहोळ यांच्या माध्यमातून तरुण चेहरा दिला. पुणे लोकसभेतील आजवरच्या खासदारांपैकी अण्णा जोशी. गिरीश बापट आणि अनिल शिरोळे हे तीन भाजपचे नगरसेवक खासदार झाले आहेत. आता आणखी एक नगरसेवक संसदेत जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 04, 2024 1:41 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Lok Sabha Result 2024 : पुण्याचं मैदान मुरलीधर मोहोळांनी मारलं! रवींद्र धंगेकर कुठे पडले कमी?