अकाऊंटमध्ये 1 कोटी 46 लाख रूपये, पैसे काढायला जाताच सरकली पुण्यातील 'जयसिंग'च्या पायाखालची जमीन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
नफा मिळणं तर लांबच, पण मूळ रक्कम आणि टॅक्सच्या नावाखाली भरलेले पैसेही परत न मिळाल्याने पीडित व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली आहे.
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीवर आभासी नफ्याचे स्वप्न दाखवून फसवणूक करण्याचे सत्र सुरूच आहे. पिंपरी-चिंचवडमधून आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. निगडी प्राधिकरणातील एका ५८ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी २४ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. नफा मिळणं तर लांबच, पण मूळ रक्कम आणि टॅक्सच्या नावाखाली भरलेले पैसेही परत न मिळाल्याने पीडित व्यक्तीने पोलिसांत धाव घेतली आहे.
मायाजालाची सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणूक १७ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली. जयसिंग बाबुराव कुरळे (वय ५८) यांच्याशी सायबर चोरट्यांनी संपर्क साधून त्यांना शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी 'जगजित सिंग' आणि 'एआयसी मॅनेजर पेड्रो' या नावांनी संपर्क साधून कुरळे यांचा विश्वास संपादन केला.
एक कोटीचा आभासी नफा!
तक्रारदाराने सुरुवातीला काही रक्कम गुंतवली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना एका ॲपद्वारे त्यांच्या गुंतवणुकीवर चक्क १ कोटी ४६ लाख रुपयांचा नफा झाल्याचे आभासी चित्र दाखवले. एवढा मोठा आकडा पाहून तक्रारदाराचा विश्वास बसला. मात्र, जेव्हा त्यांनी हा नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा चोरट्यांनी 'प्रॉफिट टॅक्स'च्या नावाखाली आणखी १३ लाख ८० हजार रुपयांची मागणी केली.
advertisement
फसवणुकीचा असा झाला उलगडा
नफा मिळवण्यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी एकूण २४ लाख ६ हजार रुपये चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यांवर भरले. मात्र, एवढे पैसे देऊनही एक रुपयाचा परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जयसिंग कुरळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी जगजित सिंग, मॅनेजर पेड्रो आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 10:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
अकाऊंटमध्ये 1 कोटी 46 लाख रूपये, पैसे काढायला जाताच सरकली पुण्यातील 'जयसिंग'च्या पायाखालची जमीन










