Pune Crime : रक्षकच धोक्यात! पुण्यात सराईताने पकडायला आलेल्या पोलिसांवर झाडल्या गोळ्या, शेवटी...
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पोलीस जवळ आल्याचे पाहताच, झुडपात दबा धरून बसलेल्या ओंकारने पोलिसांच्या दिशेने आपल्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडली.
पुणे: पुणे शहरातील नगर रस्ता परिसरात शनिवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकावर एका सराईत गुन्हेगाराने थेट गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संबंधित गुन्हेगार जखमी झाला आहे. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओंकार दिलीप भंडारे (वय २०, रा. चंदननगर) असे या चकमकीत जखमी झालेल्या सराईताचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
चंदननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बेकायदा शस्त्र बाळगणे आणि गंभीर मारहाणीच्या गुन्ह्यात ओंकार भंडारे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. तो नगर रस्त्यावरील आव्हाळवाडी परिसरात लपल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे आणि पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास परिसरात सापळा रचला.
advertisement
पोलिसांची प्रत्युत्तरादाखल कारवाई:
पोलीस जवळ आल्याचे पाहताच, झुडपात दबा धरून बसलेल्या ओंकारने पोलिसांच्या दिशेने आपल्याकडील देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळी झाडली. या हल्ल्यात पोलीस कर्मचारी सुदैवाने बचावले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपनिरीक्षक ढावरे यांनी स्वसंरक्षणासाठी आणि आरोपीला रोखण्यासाठी आपल्या जवळील सरकारी पिस्तुलातून गोळी झाडली. ही गोळी ओंकारच्या डाव्या मांडीला लागली, ज्यामुळे तो जागीच कोसळला.
advertisement
जखमी झालेल्या ओंकार भंडारेला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात भरती केले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भरवस्तीत आणि वर्दळीच्या रस्त्याजवळ झालेल्या या चकमकीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीकडे हे शस्त्र कुठून आले, याचाही शोध घेतला जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 21, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : रक्षकच धोक्यात! पुण्यात सराईताने पकडायला आलेल्या पोलिसांवर झाडल्या गोळ्या, शेवटी...











