Pune Accident: गिरणीत घाम गाळला, मुलींना शिकवलं; पण काळाचा घाला पडला अन् शिंदे कुटुंबाचा आधारच हरपला
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शिंदे कुटुंब पिठाची एक छोटी गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करतं. स्वतःच्या सुख-सोयींचा त्याग करून आई-वडिलांनी आपल्या दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्याचा ध्यास घेतला होता
पुणे : पुनावळे येथील शिंदे कुटुंबावर बुधवारी काळाने असा काही घाला घातला की, त्यांच्या आयुष्यातील सर्व स्वप्नं एका क्षणात उद्ध्वस्त झाली. ऋतुजा आणि नेहा या दोन सख्ख्या बहिणींच्या अपघाती मृत्यूमुळे केवळ शिंदे कुटुंबच नाही, तर संपूर्ण पुनावळे गाव शोकसागरात बुडालं आहे.
कष्टाने फुलवलेले नंदनवन विखुरले: शिंदे कुटुंब पिठाची एक छोटी गिरणी चालवून आपला उदरनिर्वाह करतं. स्वतःच्या सुख-सोयींचा त्याग करून आई-वडिलांनी आपल्या दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्याचा ध्यास घेतला होता. ऋतुजा ऊर्फ मिलोनी हिने नुकतंच 'श्री बालाजी विधी महाविद्यालयातून' कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं होतं, तर नेहा बी.कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. आपल्या मुली शिकून स्वतःच्या पायावर उभ्या राहत असल्याचं पाहून आई-वडिलांना अभिमान वाटत होता, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं.
advertisement
मतदानाची चर्चा ठरली शेवटची: विशेष म्हणजे, बुधवारीच आई-वडिलांनी या दोघींना पहिल्यांदाच मतदान कसं करायचं, याबद्दल माहिती दिली होती. मात्र, त्याच रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आई-वडिलांवर आली. आईचा हृदयद्रावक आक्रोश उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाचं काळीज चिरत होता.
स्कूलबस मालकाच्या डोळ्यात पाणी: दोन्ही बहिणींच्या बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या स्कूलबसचे मालक धनाजी कोयते भावुक झाले. योगायोगाने मंगळवारी रात्रीच ते शिंदे कुटुंबाला भेटायला गेले होते, तेव्हा दोघीही त्यांना आनंदाने भेटल्या होत्या. "अशा गुणी मुली देवाघरच्या झाल्या," असे म्हणताना त्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
advertisement
दहावीपर्यंत 'माटे हायस्कूल'मध्ये एकत्र शिकलेल्या या बहिणींचा अंत्यसंस्कारावेळीही एकत्रच निरोप देण्यात आला. या घटनेने कष्टकरी आई-वडिलांचा हक्काचा आधार कायमचा हिरावला गेला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 10:56 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident: गिरणीत घाम गाळला, मुलींना शिकवलं; पण काळाचा घाला पडला अन् शिंदे कुटुंबाचा आधारच हरपला










