सततचं टेन्शन अन् त्यात ‘ते’ कारण, महिलेचा टोकाचा निर्णय, पुणे पोलिसांनी थेट पतीला बोलावलं अन्...
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: पुलावर नदीपात्राकडे पाहत उभ्या असलेल्या महिलेची पोलिसांनी समजूत काढण्यास सुरुवात केली. काही वेळ संवाद साधल्यानंतर…
पुणे : आर्थिक अडचणींमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने मुळा–मुठा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तत्पर कारवाईमुळे या महिलेचा जीव वाचविण्यात यश आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास थेऊर पोलीस चौकीमध्ये एक नागरिक धावत आला. थेऊर–कोलवडी येथील नदी पुलावर एक महिला आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. माहिती मिळताच प्रसंगाचे गांभीर्य ओळखून महिला पोलीस हवालदार वैशाली नागवडे तसेच मार्शल पोलीस शिपाई ताम्हाणे आणि घुले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
पुलावर नदीपात्राकडे पाहत उभ्या असलेल्या महिलेची पोलिसांनी समजूत काढण्यास सुरुवात केली. काही वेळ संवाद साधल्यानंतर तिच्या मनातील भीती, ताण आणि अस्वस्थता लक्षात घेऊन पोलिसांनी तिला धीर दिला. पोलिसांच्या समजावणीमुळे अखेर ती महिला आत्महत्येच्या विचारातून परावृत्त झाली आणि सुरक्षितपणे बाजूला आली.
advertisement
पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन थेऊर पोलीस चौकीत आणले. चौकशीदरम्यान तिने आपले नाव वैष्णवी सुरेश पांडागळे असे सांगितले. तिच्या पतीला, सुरेश पांडागळे यांना पोलीस चौकीत बोलावून घेण्यात आले. पोलिसांनी दोघांशी सविस्तर संवाद साधत आत्महत्येचे कारण विचारले असता, वैष्णवी हिने आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, पीएसआय दिगंबर सोनटक्के आणि महिला पोलीस हवालदार वैशाली नागवडे यांनी पती-पत्नीचे समुपदेशन केले. अडचणींवर उपाय शोधता येतात, आयुष्य अनमोल आहे आणि प्रत्येक समस्येवर मार्ग निघू शकतो, असे सांगत पोलिसांनी त्यांना मानसिक आधार दिला. समुपदेशनानंतर महिलेला पतीच्या ताब्यात देऊन सुखरूप घरी पाठविण्यात आले. या घटनेमुळे लोणी काळभोर पोलिसांच्या तत्परतेचे आणि मानवी संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 9:04 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
सततचं टेन्शन अन् त्यात ‘ते’ कारण, महिलेचा टोकाचा निर्णय, पुणे पोलिसांनी थेट पतीला बोलावलं अन्...










