Pune Rain News : पुणेकरांनो काळजी घ्या! पावसामुळे खडकवासलासह अन्य धरणांची मर्यादा ओलांडली, प्रशासन सतर्क
Last Updated:
Pune News : मुसळधार पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांची पाणीपातळी मर्यादेपेक्षा जास्त झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी खडकवासला आणि वरसगाव धरणांतून आज सकाळी पाण्याचा मोठा विसर्ग सुरु झाला आहे. शहरात रात्रीपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस या विसर्गामागे मुख्य कारण आहे. जलसंपदा विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, खडकवासला धरणातून सुमारे 7,677 क्युसेक्स तर वरसगाव धरणातून 3,576 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे.
पुण्यातील मुठा नदीची पातळी सतत वाढत असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना आणि परिसरातील वस्त्यांमध्ये सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी किंवा प्राणी नदीमध्ये उतरू नये तसेच वाहने आणि साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे असे आदेश देण्यात आले आहेत.
धरणांमधील पाण्याची सद्यस्थिती पाहता, पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला धरणांतील पाणीसाठा जवळजवळ पूर्ण भरलेला आहे. पानशेत धरण 100% भरले असून 1720 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वरसगाव धरण 100% भरले असून 3,576 क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरण 98.4% भरले असून विसर्गाचे प्रमाण सकाळी 9 वाजता 10,611 क्युसेक्सपर्यंत वाढले. टेमघर धरण 100% भरले असले तरी येथून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू नाही.
advertisement
पावसाच्या तीव्रतेनुसार या धरणांमधून विसर्ग वाढवला किंवा कमी केला जाऊ शकतो. मुठा नदीत पाणी भरल्याने पूरसदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने पुणे महानगरपालिका, पोलीस आणि इतर संबंधित विभागांना तत्काळ सूचना दिल्या आहेत.
सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार, मुळा-मुठा नदीच्या धोकादायक भागात नागरिकांनी जाणे टाळावे. प्रशासन आणि जलसंपदा विभाग या परिस्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत आणि नागरिकांनी वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
advertisement
पुणेकरांसाठी हा इशारा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मुसळधार पाऊस आणि धरणातील पाण्याच्या उच्च पातळीमुळे पुढील काही तासांत परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगून सुरक्षित राहावे, तसेच अपघात टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 10:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Rain News : पुणेकरांनो काळजी घ्या! पावसामुळे खडकवासलासह अन्य धरणांची मर्यादा ओलांडली, प्रशासन सतर्क