Illegal Tobacco Sale Schools : नियम धाब्यावर! शाळा अन् कॉलेज परिसरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; पालकांमध्ये चिंता
Last Updated:
Pimpri News : शाळा आणि कॉलेज परिसरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका, भविष्यासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी : शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची उघडपणे विक्री होत असल्याचे वास्तव उघड झाले आहे. शैक्षणिक संस्थांच्या बाहेरच विद्यार्थ्यांना व्यसनाच्या आहारी नेणारा हा धंदा सर्रास चालत असून प्रशासनाचे आदेश केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, जयहिंद हायस्कूलच्या समोरच्या रस्त्यापलीकडेच परमिट रूम आणि बार सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या नजरेसमोरच व्यसन संस्कृती वाढवली जात असल्याचा आरोप होत आहे.
कायद्याने शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात सिगारेट, गुटखा, तंबाखू आणि इतर व्यसनजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. तरीही पिंपरी, काळेवाडी, थेरगाव, चिंचवड, आकुर्डी, रहाटणी, निगडी अशा भागांत पान टपऱ्या, किराणा दुकाने आणि स्टॉल्सवर खुलेपणे विक्री सुरू आहे. पाहणीत असेही दिसून आले की,12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलेदेखील हे पदार्थ खरेदी करत आहेत.
advertisement
रहाटणीत शाळेसमोरच पानटपरी
रहाटणी रस्त्यावर काकाज शाळेच्या बाहेरच एका मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये पानाचे दुकान आहे. तेथे सतत गर्दी होत असून, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. रस्त्यावर पिचकाऱ्या मारल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. इतकेच नव्हे, तर शेजारीच दुसऱ्या दुकानदाराने सिगारेटचा मोठा फलक लावून विद्यार्थ्यांना आकर्षित केले आहे.
कायदा काय सांगतो?
सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याच्या कलम 6 (ब) नुसार, शाळा-महाविद्यालयांच्या 100 यार्ड म्हणजेच (21 मीटर) परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. उल्लंघन करणाऱ्यांना किमान 200 रुपये दंड आणि त्यापेक्षा मोठी शिक्षा होऊ शकते. त्याचबरोबर कलम 4 नुसार शाळा परिसरात धूम्रपान व तंबाखू सेवनासही सक्त मनाई आहे.
advertisement
कारवाईची जबाबदारी कोणाची?
या नियमांचे उल्लंघन होत असताना कारवाई करण्याचा अधिकार महापालिका, पोलिस विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाकडे आहे. पालिका विक्रेत्यांना नोटीस पाठवून दंड आकारू शकते तसेच दुकाने सील करण्याचेही अधिकार आहेत. पोलिस गुन्हे दाखल करू शकतात, तर शाळांच्या प्रमुखांनाही दंड लावण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र, प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने विक्रेते बिनधास्तपणे हा व्यवसाय सुरू ठेवत आहेत.
advertisement
शाळांचे म्हणणे काय?
शाळा प्रशासन आणि शिक्षकांचे म्हणणे आहे की हे विक्रेते जाणूनबुजून विद्यार्थ्यांना लक्ष्य करत आहेत. आमच्या शाळेच्या समोरच पानटपरी असल्याने अनेक मुले तिथे जातात. सुरुवातीला गंमत म्हणून घेतलेले हे पदार्थ नंतर सवयीमध्ये रुपांतरित होतात. आम्ही प्रशासनाकडे तक्रार केली, मात्र काहीच कारवाई होत नाही,अशी खंत एका प्राचार्यांनी व्यक्त केली. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात चालणाऱ्या या बेकायदेशीर विक्रीवर तातडीने आळा घालावा, अशी मागणी पालक आणि शिक्षकवर्गाकडून होत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 10:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Illegal Tobacco Sale Schools : नियम धाब्यावर! शाळा अन् कॉलेज परिसरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री; पालकांमध्ये चिंता