शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! कांदा विक्रीसंदर्भात नाफेडने केला खुलासा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Onion Rate Issue : कांद्याच्या दरात घट होण्यामागे नाफेड जबाबदार असल्याचा गैरसमज निर्माण होऊ लागल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे.
मुंबई : कांद्याच्या दरात घट होण्यामागे नाफेड जबाबदार असल्याचा गैरसमज निर्माण होऊ लागल्याने शेतकरी वर्गात अस्वस्थता पसरली आहे. काही ठिकाणी नाफेडने मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री केल्याने बाजारभाव कोसळले, अशा प्रकारची चुकीची माहिती मुद्दाम पसरवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाफेडचे स्पष्टीकरण
नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड)ने या संदर्भात अधिकृत भूमिका मांडत चुकीच्या बातम्यांना पूर्णविराम दिला आहे. नाफेडने सांगितले की, ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), भारत सरकार यांच्या सूचनेनुसार यावर्षी महाराष्ट्रात फक्त 12 मेट्रिक टन (MT) कांद्याचीच विक्री करण्यात आली आहे. यापलीकडे कोणतीही विक्री झालेली नाही.
सध्या तरी नाफेडकडून राज्यात कांद्याची विक्री सुरू नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारभाव कोसळत असल्याची किंवा शेतकरी हवालदिल होत असल्याची माहिती ही दिशाभूल करणारी आणि निराधार असल्याचे नाफेडने सांगितले.
advertisement
शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य
नाफेडने शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हेच आपले सर्वोच्च ध्येय असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे. बाजारपेठेतील स्थैर्य टिकवून ठेवणे, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणे आणि शासनाच्या निर्देशानुसारच कारवाई करणे हे संस्थेचे धोरण असल्याचे नाफेडने नमूद केले.
अफवांवर कारवाईचा इशारा
नाफेडने यासंदर्भात इशारा देत म्हटले आहे की, चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरवून शेतकऱ्यांना दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती वा संस्थांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे अफवा पसरविण्याचा थेट परिणाम शेतकरी आणि ग्राहक दोघांवर होतो. त्यामुळे समाजमाध्यमांद्वारे किंवा इतर माध्यमांतून कोणतीही अप्रमाणित माहिती पसरवली गेल्यास ती थांबवण्यासाठी कायदेशीर पावले उचलली जातील. असा इशारा नाफेडने दिला आहे.
advertisement
दरम्यान, कांदा उत्पादक शेतकरी कांद्याचे दर कोसळल्यामुळे प्रचंड नाराज आहेत. योग्य भाव मिळत नसल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांविरोधात फोन आंदोलन सुरू केले आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2025 10:49 AM IST