होलिका दहनावर 'भद्रा'चे सावट, यंदा होळी नेमकी कधी पेटवायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि वेळ
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा सण म्हणजे 'होळी'. यंदा 2026 मध्ये होलिका दहन आणि रंगांची होळी साजरी करण्याच्या तारखेबाबत भाविकांमध्ये थोडा गोंधळ आहे.
Holika Dahan 2026 : वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा सण म्हणजे 'होळी'. यंदा 2026 मध्ये होलिका दहन आणि रंगांची होळी साजरी करण्याच्या तारखेबाबत भाविकांमध्ये थोडा गोंधळ आहे. पंचांगानुसार, फाल्गुन पौर्णिमा तिथी 3 मार्च 2026 रोजी असल्याने याच दिवशी 'होलिका दहन' केले जाईल. मात्र, यंदा या पवित्र सणावर भद्रा आणि चंद्रग्रहणाचे विशेष सावट असणार आहे. धार्मिक शास्त्रानुसार, भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. त्यामुळे होलिका दहन नेमके कधी करावे, हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
निश्चित तारीख आणि तिथी
पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 2 मार्च रोजी संध्याकाळी 05:55 वाजता होईल आणि तिथीची समाप्ती 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 05:07 वाजता होईल. शास्त्रानुसार, होलिका दहन प्रदोष काळात केले जाते, म्हणून 3 मार्च रोजीच हा सण साजरा होईल. त्यानंतर 4 मार्चला धूलिवंदन खेळली जाईल.
होलिका दहन शुभ मुहूर्त
होलिका दहन करण्यासाठी 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 06:22 ते रात्री 08:50 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ आहे. या 2 तास 28 मिनिटांच्या कालावधीत तुम्ही विधीवत पूजा आणि दहन करू शकता.
advertisement
भद्रा काळ आणि त्याचा प्रभाव
यंदा 3 मार्च रोजी रात्री 01:25 ते पहाटे 04:30 या वेळेत भद्रा काळ असेल. भद्रा मुख आणि भद्रा पुच्छ काळ देखील याच दरम्यान आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे प्रदोष काळ भद्रा मुक्त असल्याने सायंकाळी दहन करण्यास कोणताही अडथळा नाही. भद्रा रात्री उशिरा सुरू होत असल्याने सायंकाळची पूजा फलदायी ठरेल.
advertisement
वर्षातील पहिले चंद्रग्रहण
योगायोगाने 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण देखील लागत आहे. मात्र, हे ग्रहण भारतात दिसण्याची शक्यता कमी असल्याने त्याचा 'सूतक काळ' मानण्याची गरज नाही, असे अनेक ज्योतिषांचे मत आहे. तरीही, ग्रहणाच्या प्रभावामुळे या दिवशी केलेली पूजा आणि मंत्रजप अधिक प्रभावशाली ठरतील.
पूजेचे महत्त्व आणि राख
होलिका दहनाच्या वेळी गायीच्या शेणाचे गोळे, अक्षता, फुले आणि नवीन धान्य अर्पण करावे. दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होलिका दहनाची राख घरी आणून अंगाला लावल्याने आणि घरात शिंपडल्याने नकारात्मकता दूर होते, अशी श्रद्धा आहे.
advertisement
कोणाचे दर्शन टाळावे?
होलिका दहन हे आसुरी शक्तीच्या विनाशाचे प्रतीक आहे. असे मानले जाते की, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने पहिल्या वर्षी होलिका दहन एकत्र पाहू नये, तसेच गर्भवती महिलांनी दहनाच्या अग्नीपासून दूर राहावे. भद्रा काळ रात्री उशिरा असल्यामुळे सायंकाळच्या शुभ मुहूर्तावर होलिका दहन करणे शास्त्रोक्त ठरेल. 3 मार्च रोजी होळी पेटवून आपल्या आयुष्यातील नकारात्मकतेचा नाश करा आणि 4 मार्चला आनंदाने रंगांचा उत्सव साजरा करा.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 4:05 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
होलिका दहनावर 'भद्रा'चे सावट, यंदा होळी नेमकी कधी पेटवायची? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि वेळ








