दोन खेळाडूंमुळे विकली जात नाहीयेत IND vs PAK मॅचची तिकीटं, दुबईतून समोर आलं धक्कादायक कारण
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कप 2025 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळवले गेले आहेत, पण या सर्व सामन्यांसाठी प्रेक्षकच आले नसल्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेसमोरच्या चिंता वाढल्या आहेत.
दुबई : आशिया कप 2025 मध्ये आतापर्यंत 3 सामने खेळवले गेले आहेत, पण या सर्व सामन्यांसाठी प्रेक्षकच आले नसल्यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेसमोरच्या चिंता वाढल्या आहेत. 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याकडून आशियाई क्रिकेट परिषदेला आशा होत्या, पण चाहत्यांनी या सामन्यासाठीही रस दाखवलेला नाही. भारत-पाकिस्तान सामन्याची अर्धी तिकीटेही अद्याप विकली गेलेली नाहीत. भारत-पाकिस्तान यांच्यात जेव्हा सामना असतो तेव्हा तिकीट विक्री सुरू झाली की, अवघ्या काही तासांमध्ये स्टेडियम हाऊसफूल होऊन जातात, यावेळी मात्र अर्धी तिकीटं शिल्लक असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
का विकली जात नाहीयेत तिकीटं?
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर आकाश चोप्राने आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे लवकर विकली जात नसल्याबद्दल मोठा दावा केला आहे. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची अनुपस्थिती हे याचे मुख्य कारण असल्याचे आकाश चोप्राने सांगितले.
हे दोन्ही खेळाडू चाहत्यांना खूप आकर्षित करतात, त्यांच्या न खेळण्यामुळे या स्पर्धेवर परिणाम झाला आहे, असा दावा आकाश चोप्राने केला आहे. 'विराट रणजी ट्रॉफी सामना खेळायला गेला तेव्हाही स्टेडियम जवळजवळ भरलेले होते. त्याची अनुपस्थिती तिकिटे न विकण्याचे एक मोठे कारण आहे', असं आकाश चोप्रा म्हणाला.
advertisement
'बांगलादेश, भारत आणि अफगाणिस्तानने आशिया कपमध्ये प्रत्येकी एक सामना खेळला आहे, पण आतापर्यंत कोणत्याही स्टेडियममध्ये जास्त चाहते दिसले नाहीत. तिकिटे खूप महाग आहेत किंवा संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील लोकांना आठवड्याच्या दिवशी संध्याकाळी सामना पाहणे कठीण होत आहे', अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली आहे.
'रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळल्याने खूप फरक पडतो. जर ते उपस्थित असते तर चाहत्यांची संख्या दुप्पट झाली असती. जर 5 हजार लोक आता येत असतील, पण रोहित आणि विराट तिथे असते तर किमान 10 ते 15 हजार लोक हा सामना पाहण्यासाठी आले असते. विराट-रोहितला प्रत्यक्ष पाहण्याची संधी क्वचितच मिळते, त्यामुळे त्यांची अनुपस्थिती हे भारत-पाकिस्तान मॅचला प्रेक्षक नसण्याचं कारण आहे', असं आकाश चोप्रा म्हणाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 9:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दोन खेळाडूंमुळे विकली जात नाहीयेत IND vs PAK मॅचची तिकीटं, दुबईतून समोर आलं धक्कादायक कारण