गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाला 'पराभवाची साडेसाती'; श्रीलंका, साऊथ अफ्रिकेनंतर आता न्यूझीलंडने मोडला 37 वर्षांचा रेकॉर्ड!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Gautam Gambhir Performace As Head Coach : गंभीरच्या मार्गदर्शनाखाली किवींनी इतिहास बदलला आणि भारतावर मानहानीकारक पराभवाची वेळ आली. तब्बल 37 वर्षांचा रेकॉर्ड किवींनी मोडलाय.
Gautam Gambhir Performace As Coach : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने 2-1 ने विजय मिळवला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे हेड कोच म्हणून गौतम गंभीरने पदभार स्वीकारल्यापासून टीम इंडियाच्या कामगिरीत सातत्याने घसरण पाहायला मिळतंय. श्रीलंकेतील पराभव आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे खराब रेकॉर्ड्स यानंतर आता न्यूझीलंडने भारताला त्यांच्याच मायदेशात वनडे मालिकेत धूळ चारली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच किवी संघाने भारताला भारतात वनडे मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला असून, यामुळे चाहत्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.
तब्बल 37 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय
न्यूझीलंड संघ 1988 पासून भारताचा दौरा करत आहे, मात्र मागील सात दौऱ्यांत त्यांना एकदाही वनडे मालिका जिंकता आली नव्हती. तब्बल आठव्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळालं असून त्यांनी भारताचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. यापूर्वी 2023 मध्ये जेव्हा किवी संघ भारतात आला होता, तेव्हा भारताने त्यांना 3-0 ने व्हाईटवॉश दिला होता, मात्र गंभीरच्या मार्गदर्शनाखाली हा इतिहास बदलला आणि भारतावर मानहानीकारक पराभवाची वेळ आली. तब्बल 37 वर्षांचा रेकॉर्ड किवींनी मोडलाय.
advertisement
25 वर्षांनंतर पहिल्यांदाच...
गंभीरच्या कार्यकाळात केवळ वनडेच नव्हे, तर टेस्ट क्रिकेटमध्येही भारताची कामगिरी खालावली आहे. 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मालिका गमावली. यापूर्वी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतात टेस्ट मालिका जिंकली होती, तोच नकोसा रेकॉर्ड आता पुन्हा एकदा प्रस्थापित झाला आहे. तसेच श्रीलंकेत 27 वर्षांनंतर भारताला वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला, जे भारतीय क्रिकेटसाठी मोठं अपयश मानलं जातंय.
advertisement
भारतीय क्रिकेटसाठी सर्वात मोठा
मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धची 3-0 अशी टेस्ट मालिकेतील हार हा भारतीय क्रिकेटसाठी सर्वात मोठा धक्का ठरला. या निकालामुळे भारताची घरच्या मैदानावर 12 वर्षे अजिंक्य राहण्याची मालिका संपुष्टात आली. 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारत भारतात कधीच टेस्ट सिरीज हरला नव्हता, मात्र 2024 मध्ये हा रेकॉर्डही मोडीत निघाला. इतकेच नव्हे तर, तब्बल 10 वर्षे भारताकडे असलेली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 3-1 च्या पराभवामुळे हातातून निसटली होती. त्यामुळे आता गंभीरच्या कोचिंगवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतायेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 10:23 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाला 'पराभवाची साडेसाती'; श्रीलंका, साऊथ अफ्रिकेनंतर आता न्यूझीलंडने मोडला 37 वर्षांचा रेकॉर्ड!









