IND vs SA : कुंबळे संतापला, स्टेननेही सुनावलं, दक्षिण आफ्रिकेच्या कोचने वापरलेला 'ग्रोव्हेल' शब्द का ठरतोय वादग्रस्त?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेने भारताचा भारतामध्येच टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने पराभव केला आहे. या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचं कौतुक केलं जात आहे, पण दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेने भारताचा भारतामध्येच टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने पराभव केला आहे. या कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचं कौतुक केलं जात आहे, पण दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कॉनराड यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर माजी क्रिकेटपटूंनी टीकेची तोफ डागली आहे. गुवाहाटी टेस्टच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी क्रिकेटमध्ये वादग्रस्त इतिहास असलेल्या एका शब्दाचा भारतीय टीमसाठी वापर केला. कॉनराड यांच्या या वक्तव्यानंतर अनिल कुंबळेने त्यांना फटकारले आहे.
गुवाहाटी टेस्टच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने त्यांची इनिंग 260 रनवर घोषित केली, त्यामुळे भारताला विजयासाठी 549 रनचं आव्हान मिळालं. दिवसाचा खेळ संपल्यानंतर कॉनराड यांना दक्षिण आफ्रिकेने डाव उशिरा घोषित का केला? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी आम्हाला टीम इंडियाला 'ग्रोव्हल' होताना पाहायचं होतं, असं कॉनराड म्हणाले. ग्रोव्हल शब्दाचा अर्थ थकवून गुडघ्यावर रांगताना पाहणं.
advertisement
कॉनराडनी या शब्दाचा वापर केल्याने वाद निर्माण झाला, कारण त्यांच्या या वक्तव्याने 49 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. 1976 च्या वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेगने वेस्ट इंडिजसाठी हाच शब्द वापरला होता, ज्याचा अर्थ जमिनीवर तोंड टेकणे किंवा गुडघ्यावर रांगणे असा होता. यामुळे वाद निर्माण झाला कारण टॉनी ग्रेग हा दक्षिण आफ्रिकन वंशाचा एक गोरा क्रिकेटपटू होता आणि त्यावेळी रंगभेदामुळे दक्षिण आफ्रिकेवर बंदी घालण्यात आली होती. कॅरिबियनमध्ये कृष्णवर्णीयांना गुलाम बनवण्याच्या घटनांशीही त्याचा संबंध जोडला गेला होता. प्रत्युत्तर म्हणून वेस्ट इंडिजने इंग्लंडला 3-0 ने धूळ चारली होती.
advertisement
अनिल कुंबळेची कॉनराडवर टीका
आता, 49 वर्षांनंतर क्रिकेटमध्ये या शब्दाचे पुनरागमन झाल्याने वाद निर्माण झाला आहे आणि कॉनराडवर टीका होत आहे. पाचव्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, माजी भारतीय प्रशिक्षक आणि दिग्गज स्पिनर अनिल कुंबळे यांनी दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांना अहंकारी न राहता नम्र राहण्याचा सल्ला दिला. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात बोलताना कुंबळे म्हणाले, "या शब्दाशी इतिहास जोडलेला आहे. 50 वर्षांपूर्वी इंग्लंडच्या कर्णधाराने वेस्ट इंडिजमध्ये असे काहीतरी म्हटले होते आणि काय घडले ते आम्ही पाहिले. दक्षिण आफ्रिकेने कदाचित ही मालिका जिंकली असेल, परंतु जेव्हा तुम्ही शीर्षस्थानी असता तेव्हा तुमची शब्दांची निवड महत्त्वाची असते. अशा काळात नम्रता ही सर्वात महत्त्वाची असते', असं कुंबळे म्हणाले.
advertisement
डेल स्टेनही नाराज
दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर डेल स्टेन देखील कॉनराडच्या विधानावर नाराज झाला आणि त्याने स्पष्टपणे सांगितले की तो त्याचे समर्थन करत नाही. त्याच कार्यक्रमात स्टेन म्हणाला, 'मी त्याचे समर्थन करत नाही. त्याची शैली कदाचित टोनी ग्रेगच्या बोलण्याइतकी कठोर नसावी. पण त्यामुळे काही फरक पडत नाही. तुम्ही असे शब्द वापरू शकत नाही. ते खूप निराशाजनक आहे. माफ करा, पण ते खूप निराशाजनक आहे', अशी प्रतिक्रिया स्टेनने दिली.
view commentsLocation :
Guwahati [Gauhati],Kamrup Metropolitan,Assam
First Published :
November 26, 2025 5:37 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : कुंबळे संतापला, स्टेननेही सुनावलं, दक्षिण आफ्रिकेच्या कोचने वापरलेला 'ग्रोव्हेल' शब्द का ठरतोय वादग्रस्त?


