AI च्या बेसवर बनवलं जगातलं सर्वात लहान हवामान केंद्र,16 वर्षाच्या हितेनची कमाल, कसं करतो काम? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
नागपूर येथील तंत्रज्ञानप्रेमी तरुणाने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. हितेन धरपुरे या अवघ्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने जगातील सर्वात लहान एआय-आधारित हवामान केंद्र तयार करून नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.
नागपूर : नागपूर येथील तंत्रज्ञानप्रेमी तरुणाने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. इंद्रप्रस्थनगर, भामटी येथील हितेन धरपुरे या अवघ्या 16 वर्षांच्या विद्यार्थ्याने जगातील सर्वात लहान एआय-आधारित हवामान केंद्र तयार करून नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे लेआउटचा विद्यार्थी असलेल्या हितेनने तयार केलेले हे मिनी वेदर स्टेशन आकाराने जरी अतिशय लहान असले तरी कार्यक्षमतेत उत्तम आहे. तापमान, आर्द्रता, वायुदाब यांसारखे हवामानातील महत्त्वाचे घटक हे उपकरण रिअल टाइममध्ये मोजते आणि त्यावर प्रक्रिया करते. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने त्वरित विश्लेषणही करते.
जगातील सर्वात लहान हवामान केंद्र तयार केल्यानंतर लोकल 18 ने हितेनसोबत संवाद साधला. तेव्हा त्याने सांगितले की, त्याला लहानपणापासून संशोधनाची आवड आहे. त्याने अनेक प्रयोग करून बघितले. डान्सिंग रोबोटने वर्ल्ड वाइड रेकॉर्ड केला आहे. तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड देखील मिळाला आहे. असेच अनेक प्रोजेक्ट आहेत. त्यातूनच हे जगातील सर्वात लहान हवामान केंद्र बनविण्याची प्रेरणा मिळाली. हे उपकरण बनवत असताना अनेक अडचणी आल्या. पण 20 दिवसांत हा प्रोजेक्ट हितेनने पूर्ण केला.
advertisement
मायक्रो साईज आणि इंटरनेटशिवाय चालणारे उपकरण
फक्त 7.4 सेमी लांबी, 4.4 सेमी रुंदी आणि 6 सेमी उंची असलेल्या या उपकरणात लहान मायक्रो-कन्ट्रोलर बसवण्यात आला आहे. अंगभूत सेन्सर्स हवामानातील अगदी सूक्ष्म बदलही पकडू शकतात. विशेष म्हणजे, हे उपकरण इंटरनेटशिवाय एआयच्या मदतीने हवामानातील बदलांचा अंदाज लावून इशारा देऊ शकते.
advertisement
डिव्हाइसचे कव्हर स्वतःच डिझाइन केले
हितेनने या डिव्हाइसचे कव्हर स्वतःच सीएडी सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन केले आणि 3D प्रिंटरच्या मदतीने पीएलए मटेरियलमध्ये तयार केले. कॉम्पॅक्ट बॉक्समध्ये इलेक्ट्रॉनिक पार्टस अचूक रीत्या बसवण्याचे कौशल्यही त्याने यामाध्यमातून दाखवून दिले. उपकरणात दोन रिचार्जेबल बॅटऱ्या, वोल्टेज रेग्युलेटर आणि पॉवर स्विच देण्यात आला आहे, ज्यामुळे ते तासंतास चालू राहू शकते. लहान ओएलईडी डिस्प्लेमुळे तापमान, आर्द्रता आणि इतर डेटा सहज वाचता येतो.
advertisement
उपकरणाच्या कोडचे कॉपीराइट मिळवून हितेनने आपले संशोधन अधिक भक्कम केले आहे. जगातील सर्वात लहान एआय वेदर स्टेशन म्हणून मान्यता मिळाल्याने हितेनची निर्मिती गौरवाचा विषय तर ठरलेलीच आहे, पण, कॉम्पॅक्ट तंत्रज्ञानाच्या नव्या शक्यता देखील यातून समोर आल्या आहेत. नागपूरचा हा तरुण शास्त्रज्ञ भविष्यात कोणते नवे प्रयोग घेऊन येईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Nagpur,Maharashtra
First Published :
December 10, 2025 7:35 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
AI च्या बेसवर बनवलं जगातलं सर्वात लहान हवामान केंद्र,16 वर्षाच्या हितेनची कमाल, कसं करतो काम? Video








