Thane Crime : सोनसाखळी चोराला पकडलं, मोठं कांड समोर आलं, एक दोन नव्हे तब्बल 20 जणांना...
Last Updated:
Thane Crime : ठाणे पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीतील आरोपी अब्बास युनीस सय्यद याला कर्नाटकातील बिदर येथून अटक केली. या अटकेमुळे ठाणे परिसरातील 20 गुन्हे उघडकीस आले आहेत.
ठाणे : पायी चालणाऱ्या नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढणाऱ्या कुख्यात टोळीचा पर्दाफाश करण्यात ठाणे पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या टोळीतील मुख्य आरोपी अब्बास युनीस सय्यद उर्फ बड्डा (वय 21) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या कारवाईमुळे ठाणे, मुंब्रा, भिवंडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरातील तब्बल 20 सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
असा केला पर्दाफाश
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र पाटील आणि त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना आरोपी अब्बासचे नाव पुढे आले.
तपासादरम्यान आरोपी कल्याणमधील आंबिवली परिसरात राहणारा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र गुन्ह्यानंतर तो राज्याबाहेर पळून गेल्याचे समजले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कर्नाटकातील बिदर येथे सापळा रचत अब्बासला अटक केली.
advertisement
चौकशीत आरोपीने विविध शहरांमध्ये पायी चालणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करत सोनसाखळी खेचल्याची कबुली दिली आहे. विशेषतहा वृद्ध महिला आणि एकटे चालणारे नागरिक हे त्याचे मुख्य लक्ष्य होते. या अटकेमुळे सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे दहशतीत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुढील तपास सुरू असून टोळीतील इतर साथीदारांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane Crime : सोनसाखळी चोराला पकडलं, मोठं कांड समोर आलं, एक दोन नव्हे तब्बल 20 जणांना...










