अरेच्चा हा तर निघाला 'चायना मासा'! व्हेल पाहायला गेलेल्या चीनी लोकांसोबत गोलीगत धोका, नक्की असं काय घडलं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ही घटना चीनमधल्या शेंझेन इथल्या जियाओमीशा सी वर्ल्डमधली आहे. हे सी वर्ल्ड पाच वर्षांच्या मोठ्या सुधारणेनंतर लोकांसाठी खुलं करण्यात आलं होतं.
मुंबई : चीनमध्ये कधी काय घडेल, याबद्दल खरंच काही अंदाज लावता येत नाही. अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तिथल्या एका अॅक्वेरियममध्ये व्हेल शार्क मासा दाखवण्यासाठी लोकांना तिकीट देण्यात आलं; मात्र ते मासा पाहायला आतमध्ये गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं, की आपली फसवणूक झाली आहे. याविषयी अधिक जाणून घेऊ या.
ही घटना चीनमधल्या शेंझेन इथल्या जियाओमीशा सी वर्ल्डमधली आहे. हे सी वर्ल्ड पाच वर्षांच्या मोठ्या सुधारणेनंतर लोकांसाठी खुलं करण्यात आलं होतं. मोठा व्हेल शार्क मासा हे या सी वर्ल्डमधलं प्रमुख आकर्षण होतं. सर्वांनाच तो मोठा मासा पाहायची उत्सुकता होती. त्यामुळे अनेकांनी त्यासाठी गर्दी केली आणि तिकीट घेतलं. काही पर्यटकांनी हा व्हेल शार्क मासा व्यवस्थितपणे, बारकाईने पाहिला, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की तो खरा मासा नाही. तो चक्क एक रोबोट होता.
advertisement
व्हेल शार्क हा जगातला सर्वांत मोठा मासा म्हणून ओळखला जातो. त्याची लांबी 60 फुटांहून अधिक असते. हा मासा पाहायला मिळणार असं कळल्यावर साहजिकच लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी मासा पाहायला सी वर्ल्डमध्ये गर्दी केली; मात्र सत्य परिस्थिती कळल्यावर त्यांची घोर निराशा झाली. तो व्हेल शार्क खरा नव्हताच. तो व्हेल शार्कच्या आकाराचा एक रोबोट होता. त्याच्या आत इलेक्ट्रॉनिक मशिनरी लावण्यात आली होती.
advertisement
ही बाब काही जणांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. जियाओमिशा सी वर्ल्डतर्फे असं सांगण्यात आलं, की खरा व्हेल शार्क पकडणं आणि त्याचा व्यापार करणं यावर बंदी आहे. त्यामुळे ही क्लृप्ती लढवण्यात आली आहे. लोकांची फसवणूक करण्याचा इरादा नव्हता. नियमांचं पालन करण्यासाठी हा रोबोट शार्क तयार करण्यात आला असून, त्यातून दर्शकांना समाधान देण्याचा प्रयत्न आहे.
advertisement
चीनमध्ये याआधीही अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. याआधी एका प्राणिसंग्रहालयात कुत्र्यांना पांडासारखा रंग देऊन ते खरे पांडा असल्याचं भासवण्यात आलं होतं; मात्र ते भुंकायला लागल्यावर पर्यटकांना आश्चर्य वाटलं आणि मग खरा प्रकार त्यांना कळला. त्याबद्दल पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकारामुळे जगभरातून चीनवर टीका झाली होती. आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2024 10:59 PM IST
मराठी बातम्या/Viral/
अरेच्चा हा तर निघाला 'चायना मासा'! व्हेल पाहायला गेलेल्या चीनी लोकांसोबत गोलीगत धोका, नक्की असं काय घडलं?