Railway Knowledge : बिनधास्त झोपा, स्टेशन येताच उठवण्याची जबाबदारी टीटीची, काय आहे नियम?
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
भारतामधून दररोज लाखो प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकांना रात्रीचा प्रवास नकोसा वाटतो. अनेक प्रवासी इच्छित स्टेशन चुकण्याच्या भीतीने रात्री झोपतही नाहीत.
नवी दिल्ली: भारतामधून दररोज लाखो प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. लांब पल्ल्याचा प्रवास करताना अनेकांना रात्रीचा प्रवास नकोसा वाटतो. अनेक प्रवासी इच्छित स्टेशन चुकण्याच्या भीतीने रात्री झोपतही नाहीत. त्यामुळे ते संपूर्ण रात्र जागून काढतात. याचा परिणाम त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या नियोजनावरही होतो. अशा प्रवाशांसाठी रेल्वेने काही नियम केलेले आहेत. जे प्रवासी झोपलेले आहेत त्यांचं इच्छित स्टेशन आल्यानंतर त्यांना जागं करण्याची जबाबदारी ट्रॅव्हलिंग तिकीट एक्झामिनरची (टीटी) असते. बहुतांश प्रवाशांना या नियमाबाबत माहिती नाही.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेष सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वेने विविध नियम केलेले आहेत. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी हे नियम पाळणं बंधनकारक आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने निष्काळजीपणा दाखवला आणि प्रवाशांनी तक्रार केली तर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाईदेखील होऊ शकते.
रेल्वे नियमावलीनुसार, राजधानी, तेजस, दुरांतोसह इतर मेल आणि एक्सप्रेससारख्या प्रीमिअम ट्रेन्सच्या एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाश्याचं इच्छित स्टेशन रात्री 10 ते सकाळी सहा या वेळेत येत असेल तर त्याला उठवण्याची जबाबदारी टीटीची आहे. संबंधित प्रवाशाला व्यवस्थित इच्छित स्टेशनवर उतरवण्याची जबाबदारी टीटीची असते. यासाठी टीटीकडे वेक अप मेमो असतो.
advertisement
तिकीट तपासणीदरम्यान रात्रीच्या वेळी उतरणाऱ्या प्रवाशांचं नाव आणि सीट क्रमांक मेमोमध्ये लिहावा लागतो. ट्रेन स्टेशनवर पोहोचण्याआधी कोच अटेंडंटला संबंधित प्रवाशाकडे पाठवून त्याला उठवावं लागतं आणि त्याचं इच्छित स्टेशन आल्याची माहिती द्यावी लागते. एवढंच नाही तर एखाद्या प्रवाशाला रात्रीच्या वेळी एका स्टेशनवर उतरून दुसरी ट्रेन पकडायची असेल (तिकीटाचा पीएनआर सारखाच असला पाहिजे), त्याला त्याच्या ट्रेनची आणि प्लॅटफॉर्मची माहिती देणंदेखील या नियमांत समाविष्ट आहे. या बाबत टीटीने निष्काळजीपणा दाखवल्यास त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली जाऊ शकते.
advertisement
भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रवाशांना सेवा देते. विशेषत: जे लोक नियमितपणे लांबचा प्रवास करतात, त्यांची पहिली पसंती रेल्वेलाच मिळते. कारण, रेल्वेच्या माध्यमातून कमी दरात आरामदायी प्रवास करता येतो. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी विविध नियम आणि सुविधा तयार केलेल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 15, 2024 9:26 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Railway Knowledge : बिनधास्त झोपा, स्टेशन येताच उठवण्याची जबाबदारी टीटीची, काय आहे नियम?