सौर कृषी पंप योजनेतून शेतकऱ्याची फसवणूक, नेमकं काय आहे प्रकरण?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शेतकऱ्यांना शाश्वत ऊर्जेद्वारे पाणीपुरवठा मिळावा म्हणून राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ सुरू केली आहे. मात्र या योजनेतही अंमलबजावणीत झालेल्या ढिसाळ कारभारामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
नाशिक : शेतकऱ्यांना शाश्वत ऊर्जेद्वारे पाणीपुरवठा मिळावा म्हणून राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ सुरू केली आहे. मात्र या योजनेतही अंमलबजावणीत झालेल्या ढिसाळ कारभारामुळे लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
चार महिने झाले तरी पंप गायब
येवला तालुक्यातील रायते गावचे शेतकरी महेश काशिनाथ कहार यांची या योजनेसाठी निवड झाली होती. नियमाप्रमाणे, निवडीनंतर महावितरणकडून अधिकृत वर्कऑर्डर देण्यात आली. पंप बसविण्याची जबाबदारी ‘झायडन श्री सावित्र’ या कंपनीकडे देण्यात आली. मात्र चार महिने उलटले तरी पंपाचा मागमूस नाही.
यात अधिक गंभीर बाब म्हणजे पोर्टलवर मात्र पंप बसविण्यात आल्याचा तपशील दिसत असल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. त्यामुळे फसवणुकीचा संशय निर्माण झाला आहे.
advertisement
टोलवाटोलवीचा खेळ
महेश कहार यांनी सांगितले की, ९ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांनी अर्ज सादर केला. २२ फेब्रुवारीला कंपनीची निवड झाली, तर १४ मे रोजी वर्कऑर्डर जारी करण्यात आली. या ऑर्डरची वैधता ६० दिवसांची होती. ही मुदत संपून आता दोन महिने झाले तरी पंप शेतात बसलेला नाही.
महावितरणच्या मालेगाव परिमंडळ कार्यालयात त्यांनी फोनद्वारे आणि प्रत्यक्ष भेट देऊन अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र अधिकारी प्रत्येक वेळी “सर्व कंपन्या सारख्याच आहेत, कंपनी देईल तेव्हा पंप बसवून घ्या” असा गोलमाल सल्ला देत टोलवाटोलवी करत राहिले.
advertisement
अधिकारी-कंपनी संगनमताचा संशय
या प्रकारात महावितरण अधिकारी व निवड झालेली कंपनी दोघेही सामील असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्याने केला आहे. कारण पंप बसवला गेला नसतानाही पोर्टलवर नोंद झाल्याने भ्रष्टाचाराचा व संगनमताचा संशय बळावतो आहे. शेतकऱ्यांना हक्काचा लाभ मिळणे तर दूरच, उलट कागदोपत्री काम पूर्ण दाखवून कंपन्यांचा मनमानी कारभार झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
advertisement
शेतकऱ्यांचा संताप
या सगळ्या प्रक्रियेमुळे महेश कहार यांच्यासह गावातील इतर शेतकरीही संतप्त झाले आहेत. उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्यासाठी सौर पंपाची अत्यंत आवश्यकता असते. मात्र जबाबदार अधिकाऱ्यांची निष्क्रीयता व कंपन्यांची बेफिकिरी यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
तातडीने चौकशीची मागणी
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि कंपनीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी पारदर्शकता वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
September 14, 2025 11:57 AM IST