शेतकऱ्यांपासून ते नागरिकांपर्यंत! ग्रामपंचायतीकडून कोणत्या सुविधा मिळतात?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : राज्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची केंद्रबिंदू आहे.
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्था नसून गावकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची केंद्रबिंदू आहे. ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत विविध योजना राबवल्या जातात. या योजनांमुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला सक्षमीकरण तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत भर पडते. चला पाहूया ग्रामपंचायतीकडून कोणकोणत्या योजनांचा लाभ मिळतो.
शेतकऱ्यांसाठी योजना
गावातील शेतकऱ्यांना सिंचन व शेतीसंबंधित अनेक सुविधा ग्रामपंचायतीमार्फत मिळतात. जलसंधारण, पाणी साठवण तलाव, शेततळी, शेतातील गाळ काढणे यांसारख्या कामांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत निधी दिला जातो. तसेच शेतीसाठी विजजोडणी, शेत रस्ते दुरुस्ती, खत-बी-बियाणे यांची माहिती आणि वितरण व्यवस्थाही ग्रामपंचायत मार्गे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते.
सामान्य नागरिकांसाठी सुविधा
ग्रामपंचायतीतून ग्रामीण भागात राबवल्या जाणाऱ्या प्रमुख योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना, ज्यामधून गरीब व बेघर कुटुंबांना घरे बांधण्यासाठी अनुदान मिळते. याशिवाय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरगुती शौचालय बांधकामासाठी मदत, तसेच दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना अशा विविध सुविधा नागरिकांना दिल्या जातात.
advertisement
महिला व बालकांसाठी योजना
महिला सक्षमीकरणासाठी ग्रामपंचायतीमार्फत स्वयं सहाय्यता गटांना प्रोत्साहन दिले जाते. अंगणवाडी केंद्रांतून लहान मुलांना पोषण आहार, लसीकरण आणि प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महिलांसाठी ‘मायभूमी’ उपक्रम, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना तसेच बचत गटांना आर्थिक सहाय्य देण्याचे काम ग्रामपंचायत पाहते.
आरोग्य व स्वच्छता
ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली गावात स्वच्छता मोहीम, कचरा व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची तपासणी यांसारखी कामे केली जातात. आरोग्य विभागाच्या मदतीने ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्रे यांच्याशी समन्वय साधून गावकऱ्यांना आरोग्यसेवा दिल्या जातात. शुद्ध पिण्याचे पाणी, कचरा उचल, तसेच नाल्यांची स्वच्छता या मूलभूत सुविधा ग्रामपंचायतीमार्फत पुरवल्या जातात.
advertisement
पायाभूत सुविधा
ग्रामपंचायत गावातील रस्ते, दिवाबत्ती, शाळा इमारत, ग्रामसंकुल, सामुदायिक सभागृह, अंगणवाडी, पाणीपुरवठा प्रकल्प यांसारखी पायाभूत कामे राबवते. शेतरस्ते व पिक वाहतुकीसाठी आवश्यक रस्ते बांधकामातही ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असते.
शिक्षण व सामाजिक विकास
view commentsग्रामपंचायतीमार्फत प्राथमिक शाळांचे देखभाल काम, शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश पुरवठा यांचा समावेश होतो. गावात सांस्कृतिक कार्यक्रम, व्यायामशाळा, वाचनालय, युवक मंडळांना मदत करून सामाजिक विकास साधला जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 10:57 AM IST