तीन पिढ्यांपासून सुरू असलेला पारंपरिक व्यवसाय
चौर मठाटी व्यावसायिक जहीर शेख यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे. या व्यवसायात माझी तिसरी पिढी आहे. यातून काही भरघोस उत्पन्न मिळत नाही. पण, परंपरा जपण्यासाठी आम्ही अजूनही हा व्यवसाय सुरू ठेवलेला आहे. पोळ्याच्या 2 महिने आधीपासून माझे पूर्ण कुटुंब या व्यवसायात लागतो. कारण, ही मठाटी बघायला आकर्षक आणि सोपी दिसत असली तरीही यामागे खूप मेहनत आहे. 2 महिने मेहनत करून 8 दिवसांत हा माल आम्हाला विक्री करावा लागतो, असं ते सांगतात.
advertisement
चौर मठाटी कशी बनवतात?
सर्वात आधी ताग विकत आणावा लागतो. त्यानंतर त्याला रंगवण्यासाठी भिजत ठेवावा लागतो. ताग ही एक वनस्पती आहे. ज्यातून धागे काढले जातात. तेच धागे पारंपरिक वस्तू बनविण्यासाठी वापरतात. त्यानंतर रंगवलेला ताग सुकवावा लागतो. सुकवल्यानंतर त्याचा उपयोग चौर मठाटी बनविण्यासाठी केला जातो. तसेच पांढरा जाड कागदही यात वापरला जातो. त्या कागदाला विशिष्ट आकारात कापून त्यावर कापड लावला जातो. त्याचबरोबर लेसही लावली जाते. त्यानंतर सजविण्यासाठी आरसे, टिकली आणि इतर सजावट साहित्य वापरलं जातं. हे सर्व झाल्यानंतर ताग त्याला बांधला जातो, अशाप्रकारे चौर मठाटी तयार होते. बैल पोळ्याला सजावटीमध्ये याचा सर्वाधिक मान असतो, असं ते सांगतात.
विक्री कुठे केली जाते?
विदर्भातील अनेक भागांत पोळ्याचा बाजार भरतो. प्रत्येक शहरात किंवा गावात आठवड्याचा एक दिवस बाजार असतो. त्या बाजारात या चौर मठाटी आम्ही विक्रीसाठी घेऊन जातो. पोळ्याच्या आठ दिवस पासून बाजार सुरू होतो. 2 महिने तयार केलेला माल आम्हाला फक्त 8 दिवसांत विक्री करायचा असतो. याची किंमत सुद्धा कोणी जास्त द्यायला बघत नाहीत. 150 रुपये सांगितल्यास 100 रुपये जोडीने याची विक्री करावी लागते, असं ते सांगतात.
पारंपरिक व्यवसायाला भविष्यात धोका
या व्यवसायात मेहनत खूप आहे. आताची पिढी याकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच लोकांची धाव सुद्धा जास्तीत जास्त रेडिमेड वस्तूंकडे असल्याने मागणी सुद्धा कमी झाली आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ही पारंपरिक कला हरवण्याच्या मार्गावर आहे. तरुण पिढी अन्य व्यवसायांकडे वळत आहे. अशा परिस्थितीत या कलेला प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचं आहे. प्रोत्साहन दिल्यास हे व्यवसाय टिकू शकतात. अन्यथा या व्यवसायाला भविष्यात धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, असं ते सांगतात.