तात्या माडकर हे गेल्या 10 वर्षांपासून उसाची शेती करत आहेत. तर 4 वर्षांपासून उसात आंतरपीक घेत आहेत. कोथिंबीर, झेंडू, शेपू, चुका आणि पालक या पिकाचे आंतरपीक उसामध्ये घेत आहेत. पाच एकरात उसाची लागवड केली असून अर्धा एकरात पाच आंतरपीक घेतले आहे. शेपू, पालक, चुका, कोथिंबीर लागवडीसाठी तात्या यांना 6 ते 7 हजार रुपयांपर्यंत खर्च आला होता. तर झेंडू लागवडीसाठी 5 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. आतापर्यंत तात्या माडकर यांनी पालेभाज्या विक्रीतून 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न घेतले आहे.
advertisement
तर अर्ध्या एकरात झेंडूची 2 हजार रोपांची लागवड तात्यानी केली आहे. आता झेंडू लागवडीला सुरुवात झाली असून दसरा आणि दिवाळी सणात झेंडूची तोडणी सुरू होईल. सरस्वती झेंडूच्या फुलाला मागणी अधिक असते त्यामुळे त्यातून देखील कमीत कमी 40 ते 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती तात्या माडकर यांनी दिली. शेती कितीही असो शेतीचे योग्य नियोजन करून शेती केल्यास नक्कीच फायदा होईल, असा सल्ला शेतकरी तात्या माडकर यांनी दिला आहे.