सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरिक्षक परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या परीक्षेत अकरावी नापास तरुण राज्यातून पहिला आला आणि हे कसं शक्य आहे असा प्रश्न सर्वांना पडला. वाचकहो, हा तरुण नुसता अकरावी नापास नाहीये, तर पुढे तो इंजिनिअर झाला, दिवस-रात्र एक करून त्यानं मोठ्या कष्टानं स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली.
advertisement
सातारच्या दिवड (ता. माण) येथील अमोल भैरवनाथ घुटुकडे यांनी पोलीस उपनिरिक्षक पदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी सांगलीत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. नोकरी लागली मात्र त्यात मन रमलं नाही, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून थेट गावाकडे मोर्चा वळवला.
हेही वाचा : हॉटेलमध्ये काम करत अभ्यास, आता सरकारी शाळेत मिळाली शिक्षकाची नोकरी, दिव्यातील प्रेरणादायी गोष्ट!
दिवडला आल्यावर एमपीएससीचा अभ्यास करण्याचा निर्णय घेऊन लॉकडाऊननंतर काही दिवसातच त्यांनी पुणे गाठलं. तिथं दिवस-रात्र एमपीएससीचा अभ्यास केला. त्याच कष्टाचं चीज झालं. आज पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळालं. कौतुक याचं की, अकरावीत नापास होऊनही पठ्ठ्या जिद्दीनं पेटून उठला. इंजिनिअरही झाला आणि पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत राज्यात पहिलाही आला.
अमोल घुटुकडे यांचं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण दिवडमध्ये आणि बारावीचं शिक्षण म्हसवडमध्ये झालं. त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण सांगलीच्या बुधगाव येथील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं पूर्ण केलं. या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असताना कॅम्पसमधून त्यांना नोकरी मिळाली. त्यासाठी मुंबईला जावं लागलं. मात्र नोकरीत काही त्यांचं मन रमलं नाही. त्यामुळे मोठ्या पगाराला भुरळून न जाता त्यांनी नोकरी सोडून थेट गाव गाठलं.
हेही वाचा : ही भाकर पाच महिन्यानंतर खाल्ली तरी लागते चवदार, सोलापूरच्या महिलेने सुरू केला व्यवसाय, इतकी होतेय कमाई
मुळातच अभ्यासात हुशार असलेल्या अमोल यांनी गावी गेल्यावर एमपीएससीचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. आपण या परीक्षेत सहज उत्तीर्ण होऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांना होता. मग त्यांनी दिवडहून पुणे गाठलं. तिथं क्लास लावला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिली. यात राज्यात प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी सातारा जिल्ह्यासह माण तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला आहे.





