संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांचा हस्तक्षेप
देवनार पोलिसांचे पथक गोवंडी येथील के. डी. जंक्शन, करबला मशिदीजवळ नियमित गस्त घालत असताना काही व्यक्ती पोलिसांच्या काठ्यांसह एका वाहनचालकाशी वाद घालत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित वाहन अडवून चौकशी सुरू केली.
Weather Update : कल्याण-डोंबिवलीत हवा बदलली, सोमवारी अलर्ट नवा, हवामान अपडेट
advertisement
पोलिस असल्याची बतावणी उघडकीस
चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे कोणतेही अधिकृत पोलिस ओळखपत्र नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांची उत्तरे विसंगत असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. पुढील तपासात प्रवीण पांडे, निसार अहमद ऊर्फ सलीम शेख आणि संजय दुबे अशी आरोपींची नावे समोर आली आणि त्यांना देवनार पोलिसांनी ताब्यात घेतले.
जबरी चोरीचा प्रकार उघड
या प्रकरणात तक्रारदार अनिता मिरांडा यांनी पोलिस असल्याची बतावणी करून आरोपींनी आपल्याकडून जबरदस्तीने 13 लाख रुपयांची रोख रक्कम लुटल्याची तक्रार दिली. आरोपी नागरिकांना पोलिस असल्याचा धाक दाखवून चौकशीच्या बहाण्याने अडवत आणि त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावत असल्याचे तपासात समोर आले आहे.
मुद्देमाल हस्तगत
देवनार पोलिसांनी आरोपींकडून लुटलेली संपूर्ण 13 लाख रुपयांची रोख रक्कम, बनावट नंबरप्लेट असलेली कार तसेच पोलिसांच्या काठ्यांसारख्या दिसणाऱ्या पॉलिमी काठ्या जप्त केल्या आहेत. या साहित्याच्या आधारे आरोपी पोलिस असल्याचा बनाव करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुढील तपास सुरू
आरोपींविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, तसेच आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा सखोल तपास देवनार पोलिस करत आहेत. नागरिकांनी अशा बनावट पोलिसांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






