वडील समोर आले अन् तान्या रडली!
'बिग बॉस १९' चा प्रवास संपवून तान्या घरी परतली आणि तिने कुटुंबाची भेट घेतली. याच भेटीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तान्या तिच्या वडिलांना पाहून स्वतःला सांभाळू शकली नाही आणि त्यांना मिठी मारून रडू लागली. यावेळी भावुक झालेल्या तान्याने वडिलांना सांगितले, "मी तुमचे नाव जाणूनबुजून घेतले नाही, कारण घरातील लोक तुमचे नाव घेऊन माझी खिल्ली उडवत होते."
advertisement
या व्हिडिओची सुरुवात तान्याच्या घराबाहेरून होते. तिच्या स्वागतासाठी घराबाहेर लोकांची गर्दी जमलेली होती आणि तिच्या घराच्या बाहेर अनेक लक्झरी गाड्यांची रांग लागल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी 'तान्या तर खरंच श्रीमंत निघाली!' अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या एका युजरने 'अखेर हिचे वडील समोर आलेच' असे म्हटले आहे.
मिलिनेअर, बिझनेसवुमन आणि समाजसेविका!
तान्या मित्तल ही केवळ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नाही. ती मॉडेल, उद्योजिका आणि मिस एशिया टूरिझम २०१८ ची विजेती आहे. तिने 'हँडमेड लव्ह' नावाचा स्वतःचा हँडबॅग ब्रँड यशस्वीपणे सुरू केला. ती तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये स्वतःला सर्वात कमी वयाची मिलिनेअर म्हणून सांगते. तिच्याकडे सुमारे २ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.
यासोबतच, तान्याने तिच्या मूळ गावाजवळचे एक छोटे गाव दत्तक घेतले असून, ती दोन मुलांची पालक म्हणून त्यांचा शिक्षणाचा आणि इतर गरजांचा खर्च उचलते. तिचे सोशल मीडियावरही चांगले फॅन फॉलोईंग आहे. दरम्यान, नुकतेच तिच्या स्टायलिस्टने पेमेंट न केल्याचा आरोप केल्यामुळे ती वादात सापडली होती. पण, वडिलांसोबतच्या या भावनिक भेटीनंतर तिच्या श्रीमंतीबद्दलचे सर्व संशय दूर झाले आहेत.
